पत्नीच्या मृत्यूनंतर व्यथित पतीने घेतली पेटत्या चितेत उडी

महोबा : ११ एप्रिल – उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जैतपूर शहरातील मोहल्ला बायपासमध्ये विवाहित महिलेचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर हे दु:ख पतीला सहन झाले नाही म्हणून त्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी ज्वलंत चितेमध्ये उडी घेतली. यानंतर उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. तो किरकोळ जखमी झाला आहे. या दोघांना एक तीन वर्षाचा मुलगा देखील आहे.
घटनेची माहिती मिळताच त्याला संबंधित पोलीस ठाण्यात पोहोचविण्यात आले आहे. पोलिसांनी बृजेशला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पत्नीची मृत्यूनंतर पतीने जे केले त्यामुळे उपस्थितांचे डोळे भरुन आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी हुंडाबळीचा आरोप लावला आहे. अजनरच्या अकौना गावातील रहिवासी रामरतन यांनी आपली मुलगी उमा (वय-23) हिचे लग्न कस्बा जैतपूर येथील रहिवासी बृजेश कुशवाहासोबत झाले. हे लग्न 2016 मध्ये झाले होते.
सासरची लोक हुंड्याच्या मागणीसाठी तिला मारहाण करायचे. गुरुवारी रात्री बेडरुममध्ये उमाचा मृतदेह आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने ही घटना संशयास्पद असल्याचे समजते. मृत उमाची आई तेज कुंवर यांनी सांगितले की, आठवड्याभरापूर्वी तिच्या मुलीवर पैशाच्या मागणीसाठी मारहाण करण्यात आली होती. यानंतर त्यांनी सुनेला घरी बोलावून घरच्यांकडून पैसे घेतले आणि 70 हजार दिले.
मृत उमाच्या घरच्यांनी हुंड्याचा आरोप केला आहे. हा आरोप निराधार आहे, असे उमाच्या पतीचे म्हणणे आहे. दरम्यान, कुलपहाडचे नायब तहसिलदार पंकज गौतम यांनी परिवारातील सदस्यांचे जबाब नोंदविले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या दोघांना एक तीन वर्षाचा मुलगाही आहे. ज्याचे नाव कामेश असे आहे. दुसरीकडे, कोतवाली प्रभारी उमेश कुमार म्हणाले की, शवविच्छदन अहवालात फाशीने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही.

Leave a Reply