काही नेत्यांकडून हिंदू मुस्लीम समाजामध्ये तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू – दिलीप वळसे पाटील

मुंबई : ११ एप्रिल – मुंबई आणि महाराष्ट्रात जाणीवपूर्वक हिंदू मुस्लीम समाजामध्ये तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. यातून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा संशय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई येथे मानखुर्द परिसरात काल दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळे या सर्व परिसरात तणाव निर्माण झाला असून, काही समाजकंटकांनी या परिसरातील गाड्यांचे मोठे नुकसान केले आहे. आता या सर्व परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत असून, गरजेपेक्षा जास्त लोकांची गर्दी या परिसरात आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच सर्व जाती धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असे आवाहनही जनतेला गृहमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काही लोकांकडून दोन समाजांमध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी भडकाऊ भाषणे दिली जात आहेत. या भाषणांनंतर काही ठिकाणी वाद निर्माण करण्यासाठी लोकांना उत्तेजित केले जात आहे. मात्र, लोकांनी संयम ठेवावा. तसेच, या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, असा इशारा गृहमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी हिंदू – मुस्लीम समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहे. याचा समाजावर विपरीत परिणाम होतोय. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून धार्मिक मुद्द्याचा अजेंडा काही पक्षाकडून राबवल्या जात असल्याचा आरोप खुद्द गृहमंत्र्यांकडून केला गेला आहे.

Leave a Reply