सध्याच्या व्यवस्थेविरुद्ध बोलणारेच अपराधी ठरले आहेत – सामनामधून टीका

मुंबई, 10 एप्रिल : ‘महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते व केंद्रीय तपास यंत्रणांचे एक-दोन बडे अधिकारी मिळून महाराष्ट्रातला खेळ खेळत आहेत. राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी संबंधित एक-दोन लोकांनी अशा कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर सूतोवाच करून धमकवायचे हा प्रकार मोदी यांची प्रतिष्ठा पंतप्रधान म्हणून धुळीस मिळवणारा आहे’ अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
ईडीच्या कारवाई आणि राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील आपल्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे.
आम्हाला सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, पण आमच्या हातात काय आहे? हे जनतेने ठरवायला हवे, असे विधान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी राज्यसभेत केले. शहा यांचे बोलणे तर्कसंगत आहे; पण केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आजचे सत्ताधारी आधीच दुर्बल असलेल्या विरोधी पक्षाचे हात-पाय छाटणार असतील तर काय करायचे, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे’ असा उलट सवालच राऊतांनी केला आहे.
‘लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत आधी ते नव्हते, पण आता राज्यसभेतही भाजप व त्यांचे मित्रपक्ष शंभर आकडा पार करून पुढे गेले. राज्यसभेत काँग्रेसची अवस्था रोडावलेल्या मांजरीसारखी झाली आहे. त्याकडे बघून शहा यांनी हे विधान केले असावे. ते खरे असले तरी विरोधी पक्षाला लगाम राहावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा हंटर केंद्राने आपल्या हाती कसा ठेवला आहे त्याची प्रकरणे रोजच समोर येत आहेत’ असंही राऊत म्हणाले.
ईडी’च्या ताब्यातील अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले व पोलीस बदल्यांच्या संदर्भात चौकशी सुरू केली. पोलीस बदल्यांत भ्रष्टाचार झाला म्हणजे नक्की काय झाले व त्याचे पुरावे काय? या बदल्यांत शंभर कोटींचा व्यवहार झाला. तो पुढे पाच कोटी व आता देशमुखांवरील आरोपपत्रात तो आकडा दोन कोटींच्या खाली घसरला व त्यासाठी देशमुख व त्यांच्या कुटुंबावर 120 च्या आसपास धाडी केंद्रीय तपास यंत्रणांनी घातल्या. देशात व राज्यात पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेश व पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचा धडाकाच लावला. म्हणून तेथे बदल्यांत घोटाळा झाला काय? एखादा परमबीर सिंग तेथे उपटला व त्याने अशी तक्रार केली तर सीबीआय तेथेही तपास करू शकेल काय? असा थेट सवालच राऊतांनी केला.
‘शरद पवार हे संसद भवनात पंतप्रधान मोदी यांना भेटले. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय हेतूने चुकीच्या दिशेने कारवाया करीत आहे. राजकीय विरोधकांशी सामना करण्याची ही रीत नाही, असे पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. माझ्यावर व्यक्तिशः ईडीने कारवाई केली, त्यास कोणताही आधार नाही. पण या पद्धतीने महाराष्ट्रात, बंगालात कारवाया सुरू आहेत. अशा कारवायांत नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा थेट हस्तक्षेप असेल असे दिसत नाही’ असंही राऊत म्हणाले.
‘कार्डिलिया’ क्रूझवर जे ड्रग्ज प्रकरण झाले त्यात शाहरुख खानच्या मुलास सरळ अडकवण्यात आले. ज्या प्रभाकर साईल या पंचामुळे एनसीबी अधिकाऱ्याचा खोटेपणा समोर आला तो प्रभाकर साईल आता संशयास्पदरीत्या मरण पावला. या प्रकरणातील संबंधित अधिकारी भाजपच्या एका तरुण पुढाऱ्याचा सर्व प्रकारचा अनैतिक पाहुणचार घेतात व त्यातूनच प्रभाकर साईलचे बरेवाईट झाले काय, हा तपासाचा विषय आहे. प्रभाकर साईलच्या मृत्यूचा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये. ते रहस्यमय, तितकेच धक्कादायक ठरू शकेल’ असंही राऊत म्हणाले.
‘केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले. त्यांना विचारले, ‘‘नक्की काय सुरू आहे?’’ त्यावर ते एका शब्दांत म्हणाले, ‘‘आम्ही ‘टार्गेट’वर काम करतोय.’’ याचा अर्थ सरळ आहे. यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत. मी त्यांना विचारले, ‘‘उद्या सरकार बदलले तर कसे कराल?’’ यावर ते म्हणाले, ‘नवे सरकार सांगेल तसे काम करू. त्यांना हवे ते करू.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. तो समजून घ्यायचा आहे. मुंबई-महाराष्ट्रात पैसा आहे. त्यामुळे येथे प्रत्येक केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला काम करायचे आहे. अशा अधिकाऱ्यांसाठी जो दिल्लीत बदली करेल तो अधिकारी त्या नेत्याचे हुकूम ऐकेल. सध्या तेच सुरू आहे’ असा खुलासाच राऊतांनी केला.
‘भाजपचे महात्मा किरीट सोमय्या हे इतरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज आपटतात. ईडी व सीबीआयची धमकी देतात. पण ‘विक्रांत’ युद्धनौका वाचविण्यासाठी त्यांनी लोकांकडून प्रचंड पैसा गोळा केला. त्या पैशांचा अपहार करून लोकांना आणि देशाला फसविले. त्या फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना स्वतःच पुढे येऊन या प्रकरणाचा तपास करावा असे का वाटत नाही? असा सवालही राऊतांनी ईडीला विचारला.
‘नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान मनी लॉण्डरिंग झाले असे मेधा पाटकरांबाबत बोलणे व त्यावर बदनामीची मोहीम चालवणे हे चिंताजनक आहे. पुन्हा हे प्रकरणसुद्धा 17 वर्षांपूर्वीचे आहे. मेधा पाटकर यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यावर जर देणगी आली असेल तर तशा देणग्या भाजपच्या खात्यावरही आहेत व देणगीदारांत इक्बाल मिर्चीपासून पी.एम.सी. बँक घोटाळय़ातील सूत्रधार राकेश वाधवानपर्यंत सन्माननीय व्यक्ती आहेत. राकेश वाधवानशी किरीट सोमय्या व त्यांच्या पुत्राचे सरळ जमिनीचे व्यवहार झाले आहेत. त्याबाबत ईडीसारख्या यंत्रणा कारवाईचा कागद हलवायला तयार नाहीत. ओमर अब्दुल्लांपासून मेधा पाटकरांपर्यंत, राणा अयुबपासून आकार पटेलपर्यंत… सध्याच्या व्यवस्थेविरुद्ध बोलणारे मात्र अपराधी ठरले आहेत, असंही राऊत म्हणाले.

Leave a Reply