सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आम्ही लेट झालो – विजय वडेट्टीवार

नागपूर : ९ एप्रिल – सदावर्ते यांच्यावर कारवाई यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण आम्ही लेट झालो. शरद पवार यांच्या घरावर झालेली घटना ही निंदनीय असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
कोर्टाच्या नावने सदावर्ते यांनी भरमसाठ फी वसूल केली आहे. भडकाऊ भाषणे करून कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी उद्युक्त करण्याचा हा धंदा होता. एसटीच्या संपामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली होती. सदावर्ते यांना याचे काही देणेघेणे नव्हते. लोकांचे हाल होत आहे. त्यामुळे, अधिक करवाई करणे गरजेचे आहे. या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यावर, असे बोलणे योग्य होणार नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही. या कटकरस्थानामागे कोण आहे याची चौकशी होईल. तपासात समोर येईल. या हल्ल्यामागे कोण आहे? हे कसे काय घडले? याची चौकशी गृहविभागाने केली पाहिजे. यामागे जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
केंद्र सरकारकडून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपण काळजी घेण्याची गरज आहे. साऊथ आफ्रिकेतून आलेला नवीन रुग्ण बरा झाला आहे. तरी मास्क घालून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

Leave a Reply