रोजगार मिळवून देण्याच्या नावावर महिलांची आर्थिक फसवणूक

अकोला : ९ एप्रिल – महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या नावाने हजारो महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक दीड कोटी रुपयांची आहे. संगीता चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीने अकोल्यात कार्यालय सुरू केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिव संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून महिलांना बटन बनविण्याची मशीन व बटण बनविण्यासाठी कच्चा माल यासाठी अनेक महिलांकडून 11 हजार रुपये घेतले. एका महिलेने आणखी तीन महिला जोडल्यास त्यांना दरमहा 12 हजार रुपये महिना मिळेल, असे सांगितले. त्यानुसार महिलांनी हजारो महिलांना सोबत जोडले. सुरवातीला कच्चा माल दिला. त्यानंतर माल देण्यास नकार दिला. त्यामुळे महिलांना कमाई करता आली नाही.
पहिली स्कीम बंद पडल्याने त्यानंतर कंपनीने दुसरी स्कीम काढली. मसाला बनविण्यासाठी महिलांकडून 15 हजार रुपये घेतले. त्यासाठी कच्चा मालही दिला. परंतु, सुरुवातीला महिलांना आधीसारखीच महिलांची साखळी तयार करण्यास सांगितली. महिलांनी यामध्येही हजारो महिला जोडल्या. त्यानंतर परत ही स्कीम बंद पाडली. सुमारे दोन ते तीन हजार महिलांची अशाप्रकारे आर्थिक फसवणूक करण्यात आली. पण, त्यांना रोजगारही देण्यात आला नाही. याप्रकरणी सुरुवातीला संगीता चव्हाण यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, खदान पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले.
फसवणूक झालेल्या महिलांनीही पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदन दिले. त्यानंतर खदान पोलिसांनी यामध्ये संगीता चव्हाण आणि अजित महादेव हिरवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने संगीता चव्हाण हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय नाफडे करीत आहे.

Leave a Reply