५ वर्षीय मुलीवर केला अत्याचार

नागपूर : ८ एप्रिल – वलनी झोपडपट्टीत राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना रात्री ११.३0 वाजता उघडकीस आली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिस स्टेशन येथे आरोपीवर कलम ३७६ ए, बी, जे, के, ३६३, ५0६ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा ४, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. सुनील ऊर्फ मोटू धनलाल धुर्वे (रा. वलनी तट्टा लाईन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी महिला ही तिचा पती आणि चार वर्षीय मुलगा आणि पीडित ५ वर्षीय मुलीसह वलनीच्या तट्टालाईन झोपडपट्टी येथे राहतात. फिर्यादीची आईसुद्धा त्याच मोहल्ल्यात काही अंतरावर राहते. आरोपी सुनील हा फिर्यादी महिलेच्या शेजारीच राहतो. आरोपी हा त्याची आई, तीन भाऊ, वहिनी आणि दोन पुतणी यांच्यासोबत राहतो. पीडित मुलगी ही आरोपीच्या पुतणीसोबत रोज खेळायला जात असते. रात्री ९.३0 वाजता फिर्यादीचा पती हा घरी दारू पिऊन आला. फिर्यादी महिला ही मुलगी व मुलगा याच्यासह पतीचा राग आल्याने रागारागाने आईकडे निघून गेले होते. त्यांच्यामागे तिचा पती लगेच पोहोचला. पत्नीला सोडून मुलगा व मुलीला घेऊन घरी जातो, असे सांगून निघून गेला. मात्र, घरी न जाता शेजारी राहणाऱ्या आरोपी सुनीलच्या घरी टीव्ही पाहण्याकरिता मुलांना घेऊन गेला. रात्री १0 वाजता फिर्यादी ही आरोपी सुनीलच्या घरी आली. तेव्हा तिची ५ वर्षीय पीडित मुलगी घरी नव्हती. पतीला विचारपूस केली असता तेव्हा आरोपीच्या आईने सांगितले की, टीव्ही पाहत असताना मुलगी सोफ्यावर झोपून गेली असल्याने तिला सुनील हा तुमच्या घरी झोपविण्याकरिता गेला आहे. घरी जाऊन पाहिले तर मुलगी घरी दिसली नाही. फिर्यादी, तिचा पती आणि सुनीलच्या आईने मुलीचा शोध घेणे सुरू केले. तेव्हा मुलगी हरविली असल्याची बातमी झोपडपट्टीत पसरली. रात्री ११ च्या सुमारास पीडित मुलगी ही झोपडपट्टीच्या मागील भागातून अंधारातून रडत येताना दिसली. तिला विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत झालेला प्रकार सांगितला. लोकांनी पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आरोपीला वलनी शिवारातून पकडले.

Leave a Reply