ऍड. उके विरोधातील कारवाई बेकायदेशीर – वकील संघटनेचा दावा

नागपूर : ८ एप्रिल – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील ऍड. सतीश उके यांच्याविरुद्ध ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याची टीका नागपूर जिल्हा बार असोसिएशन आणि स्थानिक वकिलांच्या संघटनेने आज पत्रपरिषद घेऊन केली.
ऍड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्त आज वकिलांनी जिल्हा न्यायमंदिराच्या समोर ईडीच्या विरुद्ध नारे देऊन निषेध व्यक्त केला. या संदर्भात वकिलांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईडीचा निषेध करणारे पत्र आज पाठवले अशी माहिती नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष के. एन. सतिया, नितीन देशमुख ऍड. वरून परमार ऍड. अक्षय समर्थ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सतीश उके यांना खोट्या तीन प्रकरणात अटक दाखवण्यात आली आहे, ते प्रकरण ईडीचे नसून स्थानिक न्यायव्यवस्थेतील प्रकरण आहेत, खासगी संपत्तीबाबत ऍड. उकेविरुद्ध तक्रार असेल तर न्यायालयात ही केस सुरु आहे ईडीने कारवाई जी केली ती पूर्णतः बेकायदेशीर आहे, न्या. लोया प्रकरण दाबण्यासाठी ईडीची कारवाई करण्यात आली का? असे पत्रकारांनी विचारले असता, वकिलांनी सांगितले त्यातून ही कारवाई होऊ शकते तसेच ऍक्सिस बँकेचे जे प्रकरण आहे त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केल्यामुळे त्याचा सुड उगवण्यासाठी ईडी मार्फ़त कारवाई करण्यात आली असे या प्रकरणावरून दिसते. उके यांना षडयंत्र रचूनच अटक करण्यात आली असल्याचा आरोप वकील संघटनेने केला आहे.

Leave a Reply