आता कार्डशिवाय एटीएममधून काढता येणार पैसे – रिझर्व्ह बँकेने दिली माहिती

नवी दिल्ली : ८ एप्रिल – कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी (8 एप्रिल) महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआय ने भारतातील सर्व बँकांमधील सर्व एटीएम मध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आरबीआय गव्हर्नर तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना याबाबत माहिती दिली. दास म्हणाले की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा युपीआय द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.
‘सध्या ही कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा काही बँकांच्या मर्यादित एटीएममध्येच उपलब्ध आहे. आता असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे की कार्डविरहित रोख रक्कम काढण्याची सुविधा यूपीआयचा वापर करून सर्व बँकांमध्ये आणि एटीएम नेटवर्कमध्ये उपलब्ध करून दिली जावी,’ याबाबत घोषणा करताना दास यांनी अशी माहिती दिली.
गव्हर्नर पुढे म्हणाले की, ‘व्यवहारात सुलभता वाढवण्याव्यतिरिक्त, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग इत्यादी प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल’.
या सुविधेचं स्पष्टीकरण नावातच आहे. ही सुविधा वापरताना बँक कस्टमरला एटीएममधून पैसे काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. सध्या ही सुविधा विविध बँकांमध्ये उपलब्ध आहे. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक एटीएममध्ये जाण्यासाठी तयार नव्हते, त्यावेळी ही सुविधा सुरू करण्यात आल आहे.

Leave a Reply