संपादकीय संवाद – २५ वर्ष शिवसेनेची सत्ता हे दिवास्वप्नच ठरेल

पुढील २५ वर्ष शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत दिसेल, असा दावा शिवसेनेचे नव्या दमाचे एक नेते वरूण सरदेसाई यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलतांना केला आहे. त्यासाठी सरदेसाई आणि त्यांच्या शिवसेनेला पंचनामातर्फे खूप खूप शुभेच्छा…
मानवी जीवनात स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसाच सरदेसाईंनाही आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. वरूण सरदेसाई देखील प्रयत्नशील असतीलच हा विश्वास आहे. मात्र स्वप्न बघतांना ते वास्तवात आणणे कितपत शक्य आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. तो विचार केला नसेल तर वरूण सरदेसाईंनी हा विचार आधी करावा आणि मगच दावा करावा, अशी आमची सूचना आहे.
शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली, या घटनेला आता ५६ वर्ष होतील. या ५६ वर्षात शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात तरी आपले अस्तित्व निर्माण करू शकली काय? तेही बाजूला ठेवा पण स्वबळावर विधानसभेत एकदा तरी तीन आकड्यात आपले आमदार निवडून आणू शकली काय? याचा वरूण सरदेसाईंनी आढावा घेणे गरजेचे आहे. शिवसेनेची स्थापना झाली ती मुंबईतील मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी अमराठींना विरोध हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य होते, १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बॅ. रजनी पटेल होते, तर जनता पक्षाचे अध्यक्ष शांती पटेल हे होते. त्यावेळी शिवसेनेचा प्रचाराचा नारा “काँग्रेसचे रजनी पटेल, जनताचे शांती पटेल, मराठी माणसा तुला हे पटेल?” असाच होता. या घोषणेने मुंबईतल्या सर्व भिंती रंगल्या होत्या. शिवसेनेचे हे धोरण १९८७ पर्यंत होते, त्यानंतर शिवसेना हिंदुत्वाकडे वळली. असे असले तरी अधून-मधून मराठीप्रेम जागे होतेच.
१९८७-८८ पर्यंत शिवसेना ही मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक या पट्ट्यातच होती. नंतर ती महाराष्ट्राच्या इतर भागात गेली खरी, पण मराठवाडा वगळता कुठेही शिवसेनेची पाळेमुळे रुजू शकलेली नाहीत. कोकणात शिवसेनेचा जोर होता, तो नारायण राणेंमुळे आता राणेही भाजपवासी झाले आहेत.
महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या ५ तर महसूलदृष्ट्या ७ भाग आहेत. या प्रत्येक परिसरातील प्रश्न वेगवेगळे आहेत, त्यातही राजधानी मुंबई इथले प्रश्न तर अगदीच वेगळे आहेत. शिवसेनेची जडण – घडण ही मुंबईत झाली असल्यामुळे तिकडल्या प्रश्नांबाबत त्यांना जिव्हाळा आहे. मात्र इतर ठिकाणचे प्रश्न त्यांनी अभ्यासलेले नाहीत,आजही शिवसेनेत स्थानिक नेतृत्वाची वाढ होऊ दिली जात नाही. सर्व अधिकार मातोश्रीवरच केंद्रित झालेले असतात. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई वगळता शिवसेनेचे सक्षम नेतृत्व विकसित होऊ शकले नाही. अश्या स्थितीत शिवसेना वाढणार कशी? आणि सत्तेत येणार कशी?
यावेळी शिवसेना सत्तेत आली ती अपघाताने आणि दगाबाजीच्या राजकारणामुळे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आज शिवसेनेने सत्तेसाठी युती केली ते शिवसेनेच्या दृष्टीने कधीतरी विश्वासपात्र होते काय? याचा विचार सरदेसाईंनी करायला हवा. हे पक्ष तात्पुरती गरज म्हणून शिवसेनेसोबत आले आणि शिवसेनेचा वापर करून घेत आहेत. हे नेत्यांच्या लक्षात आले नसेलही मात्र सामान्य शिवसैनिकांच्या लक्षात ही बाब निश्चित आली आहे. त्यामुळे हे पक्ष २०२४ साली शिवसेनेला साथ देतीलच याची कोणतीही खात्री नाही आणि शिवसेनेने यांच्यासोबत निवडणूक लढवली तरी सामान्य शिवसैनिकाला ते कितपत रुचेल हाही खरा कळीचा मुद्दा राहील.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता पुढील २५ वर्ष महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता हे वरूण सरदेसाईंचे विधान म्हणजे दिवास्वप्नच ठरणार आहे. तरीही सरदेसाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा…..

अविनाश पाठक

Leave a Reply