फेसबुकच्या फ्रेंडने अत्याचार करून, तरुणीचे न्यूड फोटो केले व्हायरल

नागपूर : ६ एप्रिल – नागपूर शहरातील एका तरुणीसोबत नांदेडच्या एका तरुणाने आधी अत्याचार केला. त्याचे पितळ उघडे पडल्यानंतर तरुणी त्याला टाळू लागली. परिणामी त्याने त्यांच्यातील झालेल्या संबंधाचे काही न्यूड फोटो हे तरुणीच्या नातेवाईकांना पाठविले. तरुणीची या आरोपी तरुणासोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. यावेळी आरोपीने तो पोलिस दलात नोकरीवर लागणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोपान बालाजी बासिंगे (वय २७) असे आरोपीचे नाव असून, तो नांदेड जिल्हय़ातील रहिवासी आहे.
सोपान नांदेड जिल्हय़ातील मुरकेवाडी (ता. लोहा) येथे वास्तव्याला आहे. सोशल मीडियाच्या जगतात त्याची आणि पीडित तरुणीची फेसबुकवरून मैत्री झाली. लगेचच त्यांनी आपसात मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर त्यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात बदलले. यावेळी आरोपी सोपान याने तो पोलिस दलात नोकरीवर लागणार असल्याचे सांगितले होते. यावेळी सोपानने तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे पीडितेला सांगत तिचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, आपसात बोलताना त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर जानेवारी महिन्यात सोपान हा पीडितेला भेटण्याकरिता नागपूर शहरात आला होता. यावेळी ते दोघे भेटले आणि त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन सोपानने सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी सोपान याने पीडित तरुणीचे काही न्यूड फोटो काढले होते. हे फोटो वारंवार दाखवत तो पीडितेला शरीरसंबंधासाठी बाध्य करू लागला. पीडितेने विरोध केला असता तो धमकी देऊ लागला. दरम्यान, पीडितेला सोपानच्या वर्तणुकीचा संशय आल्याने तिने त्याची चौकशी करण्याचे ठरविले. तिने त्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सोपान हा पोलिसमध्ये नसल्याचे आढळून आले. त्याने तिची फसवणूक केल्यामुळे पीडिता सोपानच्या कुठल्याही धमकीला न घाबरता त्याला टाळू लागली होती. परंतु, पीडिता टाळत असल्याचा राग आल्यामुळे सोपानने पीडितेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर तिचे न्यूड फोटो पाठविले. ही बाब पीडितेला माहिती नव्हती. परंतु, नातेवाईकांच्या मोबाईलवर जेव्हा असले फोटो आले तेव्हा ते थबकले आणि त्यांनी पीडितेला याबाबत विचारणा केल्यानंतर तिही हादरली. यानंतर पीडितेने या प्रकरणी कळमना पोलिसात सोपानविरुद्घ तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्घ अत्याचार, विनयभंग तसेच आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply