पक्षासाठी पेटून उठा – वरून सरदेसाई

नागपूर : ६ एप्रिल – आपसातील मतभेद विसरून पक्षासाठी पेटून उठून वज्रमूठ तयार करा, असे आवाहन युवासेनेचे नेते, सचिव वरून सरदेसाई यांनी आज येथे केले.
युवासेनेतर्फे डॉ. देशपांडे सभागृहात निश्चय मळावा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, नगरसेवक किशोर कुमेरिया जिल्हाप्रमुख इटकेलवार, मुकेश कदम, धुर्वे, प्रवीण पाटकर, हर्षल काकडे, यादव, आदी उपस्थित होते. आज पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील युवासेनेचा जंगी मेळावा नागपुरात झाला, युवासैनिकांनी वरून सरदेसाई यांचे उत्साहात स्वागत केले.
निश्चय मेळाव्याला संबोधित करताना वरून सरदेसाई म्हणाले की, युवासेनेचे विदर्भात चांगले काम सुरु आहे, ४४ अंश सेल्सियसच्या तापमानातही उष्णतेची लाट आली असतानाही युवासेनेची भागवि लाट सभागृहात दिसत आहे. एक वर्षाआधी मी आलो तेव्हा युवासेनेचे मोजके पदाधिकारी होते, पण आता युवासैनिकांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. राज्यातील विविध युवासंघटनेतील चांगले पदाधिकारी युवासेनेत येत आहेत, त्यामुळे संघटना मजबूत होत चालली आहे. येणाऱ्या निवडणुका आपल्याला पूर्ण ताकदीनिशी लढायच्या असल्यामुळे युवासैनिकांनी राज्य शाशाच व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विचार घराघरात पोहोचवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
युवासेनेने मुंबई विद्यापीठात आपली ताकद दाखवून दिली आहे, तीच ताकद आता आपल्याला नागपूर विद्यापीठातही दाखवायची आहे, सिनेट निवडणुकीत आपले उमेदवार जास्तीत जास्त प्रमाणात कश्या पद्धतीने निवडून येतील या दृष्टीने युवासैनिकांनी कामाला लागावे व सदस्य नोंदणी करावी, जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन वरून सरदेसाई यांनी युवासैनिकांना केले. आता आपले ध्येय विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असून दहापैकी दहा जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. शिवसेनेची चांगली कामगीरी सुरु असल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे आघाडी सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण युवासैनिकांच्या फौजेपुढे त्यांचे काही चालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना आ. आशिष जयस्वाल यांनी ठाकरे कुटुंबियांवर नागपूर जिल्ह्यातील युवकांचे विशेष प्रेम आहे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे मंत्री असल्यामुळे ते महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देत आहेत,विदर्भाची जबाबदारी वरून सरदेसाई यांनी घ्यावी अशी मागणी आशिष जयस्वाल यांनी केली. युवासैनिकांची ताकद पहिलीपासूनच सैनिकांकडे आहे. पण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे आशिष जयस्वाल यांनी सांगितले .
मेळाव्याला मार्गदर्शन करताना खा. कृपाल तुमाने यांनी आघाडीच्या योजना गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, घराघरात शिवसेना पोहोचावी असे आवाहन कृपाल तुमाने यांनी केले. प्रवीण पाटकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात युवासेनेच्या प्रगतीबाबत माहिती देऊन येत्या सिनेटच्या निवडणुकीसाठी युवासैनिकांनी सज्ज राहावे तसेच पक्षासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन केले.

Leave a Reply