संपादकीय संवाद – काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काँग्रेसमधली घराणेशाही संपवावी लागेल

देशातील लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेसचे पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. आज काँग्रेस कार्यसमितीच्या सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना त्यासाठी पक्षाची एकता टिकवणे गरजेचे असल्याचे सांगून पुनरुज्जीवनासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे सोनियांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न करण्याचे सोनियाजी आवाहन करतात म्हणजे काँग्रेसची पुरती वाताहत झाल्याचे सोनियाजी मान्य करतात हे नक्की झाले. मात्र काँग्रेसची अशी वाताहत होण्याचे नेमके कारण काय? याचा शोधही सोनियाजींनी घ्यायला हवा, मात्र तो शोध घेण्याचा कोणताही प्रयत्न सोनियाजी करतांना दिसत नाही. हम करे सो कायदा या न्यायाने वागतांना काँग्रेसमधला जी-२३ गट म्हणजेच पक्षहित जपणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगत असतानाही सोनियाजी काही मनावर घेत नाहीत. असे दिसून येते. जर पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर ही अडेलतट्टू भूमिका सोनियाजींना आणि गांधी परिवाराला सोडावी लागणार आहे.
देशातील लोकशाहीसाठी काँग्रेसचे पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे सोनियाजी म्हणतात, मात्र काँग्रेस पक्षात लोकशाही आहे का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष हा नेहरू गांधी परिवाराची खासगी मालमत्ता असल्यासारखा झाला आहे. अनेक वर्ष पक्षाध्यक्ष कुणीही असला तरी सत्तासूत्र गांधी परिवाराकडेच राहायचे नंतर गांधी परिवारातील सदस्यच अध्यक्ष होऊ लागला. १९८९ पासून काँग्रेस पक्ष लोकसभेत कधीही स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही. आता तर विरोधी पक्षनेतेपद मिळावे इतकेही सदस्य पक्षाजवळ नाहीत. देशातील फक्त २ राज्यांमध्ये आता काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. मात्र असे का घडले? याचा गांभीर्याने कधीच विचार केला जात नाही. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले होते, त्यावेळी नेहरू गांधी परिवाराबाहेरचा कुणीतरी अध्यक्ष करावा असे त्यांनी सुचवले होते, मात्र लगेचच सूत्रे सोनियाजींच्या हाती दिली आणि तेव्हापासून सोनियाजी पक्ष सांभाळत आहेत. पक्षाला कोणताही नवा अध्यक्ष मिळू शकला नाही किंवा मिळू दिला नाही.
त्यामुळेच पक्ष वाढू शकलेला नाही. गेल्या ५० वर्षात पक्षाची संघटनात्मक बांधणी झालेली नाही, वॉर्ड अध्यक्षापासून तर प्रांत अध्यक्षापर्यंत आणि केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत सर्व पदे सोनियाजी आणि राहुल ठरवतात. अश्यावेळी पक्षात राहणार कोण? त्यामुळेच पक्षातील अनेक दिग्गज पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. उरलेलीही केव्हा जातील हे सांगता येत नाही. अश्यावेळी पक्ष वाढणार कसा? याचा विचार व्हायला हवा.
काँग्रेसमध्ये अनेक सक्षम दिग्गज नेते आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही पक्षाचे नेतृत्व देता येऊ शकेल, त्यासाठी पक्षातील घराणेशाही संपवावी लागेल,सोनियाजी ते करतील काय? आणि त्यांचे भक्त ते करू देतील काय? याचा विचार व्हायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply