राजस्थान दंगलीत आगीतून चिमुकल्यासह तिघांना वाचविणाऱ्या पोलीस हवालदाराच्या फोटो व्हायरल

जयपूर : ५ एप्रिल – असं म्हटलं जातं की एक हजार शब्द जेवढे सांगू शकत नाही तेवढे एक छायाचित्र सांगून जाते. राजस्थानमधील करौली येथे झालेल्या हिंसाचारानंतर एक फोटो समोर आला आहे. चहूबाजूनी आगीने घेरलं असताना हवालदाराच्या खांद्यावर एक चिमुकला निर्धास्तपणे विसावला होता. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोतील हवालदाराचे कौतुक होत आहे.
राजस्थानमधील करौलीयेथील नव संवस्तरच्या निमित्ताने निघालेल्या रॅलीत हिंसाचार उसळला. येवेळी दोन गटात मारहाणीच्या व जाळपोळच्या घटना घडल्या. याचदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने जीवावर उदार होत चिमुकल्यासह तीन जणांचे प्राण वाचवले. नागरिकांना घटनास्थळावरुन सुखरुप बाहेर काढलं. या हवलदाराचे नाव नेत्रेश शर्मा असं आहे. करौली शहर चौकीवर हवालदार म्हणून ते कार्यरत आहेत.
करौलीत हिंसाचार उसळल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी नेत्रेश यांचे लक्ष फुटा कोट परिसरात असलेल्या एका दुकानावर पडले. हे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुकानात दोन महिलांसह एक चिमुकला अडकला होता.
नेत्रेश यांनी प्रसंगावधान राखत दुकानात शिरले आणि चिमुकल्याला बालकाला छातीशी कवटाळत दुकानातून सुखरुप बाहेर काढले. नेत्रेश यांच्या कार्याचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. नेत्रेश यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही त्यांचे कौतुक केलं आहे. बक्षीस म्हणून नेत्रेश यांना बढती देऊन त्यांची हेड कॉन्स्टेबल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply