तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने लखनौच्या विमानाचे नागपुरात इर्मजन्सी लँडिंग

नागपूर : ५ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लखनौच्या दिशेने उड्डाण भरलेल्या इंडिगो विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे तत्काळ हे विमान वळविण्यात आले आणि विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आली. दरम्यान, या घटनेत कुठल्याही प्रवाशांना काहीही झाले नसून सर्व सुखरूप आहेत. परंतु, विमानात अचानक झालेल्या बिघाडाने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी (ता. ४ एप्रिल) नागपूर ते लखनौ इंडिगो विमानाच्या प्रवाशासाठी प्रवाशी विमानतळावर पोहोचले. आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर विमानतळ प्रशासनाकडून या प्रवाशांना विमानाकडे आणण्यात आले. विमानात प्रवाशांचे सामान आणि प्रवाशी चढले आणि निश्चित वेळेत विमानाने लखनौकडे जाण्याची तयारी केली. विमानाचा प्रवास सुरू झाला आणि विमानाने उड्डाण भरली. इतक्यात विमानात तांत्रिक बिघाड आला. अचानक विमानातून धूर निघण्यास सुरुवात झाली. वैमानिकाच्या ते लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान राखत त्यांनी विमान नागपूर विमानतळाच्या दिशेने वळविले आणि विमानतळावर आपत्कालीन स्थितीत या विमान उतरविण्यात आले. या विमानात ५0 प्रवाशांसह तसेच ४ क्रू मेंबर्स होते. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाडाचे कळताच सर्वांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांना विमान नागपूर विमानतळावर उतरत असल्याचे सांगण्यात आले. विमान खाली उतरेस्तोवर प्रवाशांचा जीवात जीव नव्हता. विमान सुखरूप उतरताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, विमानातील सर्व प्रवाशी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाईनकडून सांगण्यात आले आहे. इंजिनिअरिंग टीमकडून विमानातील बिघाडाचा शोध घेतला जात आहे. शनिवारीही रांचीमधे इंडिगो विमानात बिघाडाची घटना समोर आली होती. यानंतर रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर कोलकाताला जाणारी फ्लाइट रद्द करण्यात आली. तर सोमवारीपुन्हा इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाडाची घटना समोर आली आहे.

Leave a Reply