संपादकीय संवाद – शरद पवारांनी पुन्हा एकदा मान्य केले सोनियाजींचे नेतृत्व

भाजपला विरोधकांचा सक्षम पर्याय द्यायचा असेल, तर काँग्रेसला टाळून चालणार नाही, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्याचे वृत्त आहे. आज देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याचे सर्व राज्यांमध्ये काही ना काही अस्तित्व आहे. त्यामुळे काँग्रेसला टाळून विरोधकांचे ऐक्य करता येणार नाही असे पवारांनी ठणकावले आहे.
पवारांचा हा सल्ला अत्यंत व्यवहार्य असाच मानावा लागेल. आज आपल्या देशात अनेक पक्ष आहेत, मात्र अनेक पक्षांचे अस्तित्व एखाद्या राज्यापुरते किंवा त्याहीपुढे जाऊन एखाद्या परिसरापुरते असलेले दिसून येते. अश्या पक्षांचे नेते मात्र पंप्रधानपदाची स्वप्ने बघत असतात. त्यामुळे हे सर्व पक्ष विरोधकांच्या ऐक्याचे प्रस्ताव समोर मांडत असतात.
मात्र असे असले तरी हे सर्व पक्ष काँग्रेसला टाळून भाजपला पराभूत करण्याचा विचार करतात. हा विचार अशक्य असल्याचे पवारांनी अधोरेखित केले आहे, पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडून स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष काढला. या पक्षाच्या बॅनर वर पवार निवडणुका लढले मात्र निवडणूक होताच त्यांनी पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्तेत सहभाग मिळवला. महाराष्ट्रात आपण स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही हे पवारांनी त्याचवेळी ताडले होते. म्हणूनच त्यांनी लगेच काँग्रेसशी हातमिळवणी केली. आताही काँग्रेसला टाळून भाजपला पर्याय देता येणार नाही ते लक्षात आल्यामुळे पवारांनी ही सूचना केलेली दिसते आहे.
शरद पवार हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात त्यामुळे पवारांनी टाकलेले प्रत्येक पाऊल आणि त्यांनी उच्चरलेला प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक असतो यात शंका नाही. आज विरोधकांमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या राज्यातून भाजपला पराभूत करण्यासाठी दंड थोपटतो आहे. त्यांच्या नेत्यांना पंतप्रधान होण्याची घाई झालेली आहे. मात्र काँग्रेसला टाळून तुम्हाला देशात सत्ता मिळवता येणार नाही, आणि काँग्रेसबरोबर जायचे असेल तर गांधी नेहरू परिवाराला मोठेपणा दिल्याशिवाय पर्याय नाही, असा अप्रत्यक्ष इशारा पवरांनी दिला आहे, असे म्हणता येईल. थोडक्यात १९९९ साली गांधी नेहरू परिवाराचे मोठेपण नाकारून बाहेर निघणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा सोनियाजींचे नेतृत्व मान्य केले आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply