चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

बीजिंग : २ एप्रिल – चीनमध्ये करोना साथीच्या नवीन लाटेमुळे परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की चीनच्या प्रशासनाने देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाउन लागू केलं आहे. या काळात शहरातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. शांघाय शहराचे अधिकारी शहरात संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शांघायमधील कोणत्याही इस्पितळात करोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असूनही, चीनचा दावा आहे की शांघायमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला नाही.
शांघायच्या पूर्व पुडोंग भागात परिस्थिती खूपच गंभीर आहे. रिपोर्टमध्ये शांघायच्या डोंगहाई एल्डरली केअर इस्पितळात काम करणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर या परिस्थीबद्दल सांगण्यात आले. इस्पितळात काम करणार्या लोकांनी सांगितले की ते वृद्ध रुग्णांवर उपचार करण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्यापैकी अनेकांचा मृत्यूदेखील झाला. शांघायच्या सर्वात मोठ्या इस्पितळातील एका नर्सने सांगितले की, ‘तीन आठवड्यांपूर्वी करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता.’
शांघाय प्रशासनाने पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाल्यानंतर डोंगहाई एल्डरली केअर इस्पितळ सामान्य लोकांसाठी बंद केलं. तेव्हापासून शांघाय महानगरपालिकेचे रोग नियंत्रण पथक या इस्पितळातून उर्वरित भागात संसर्ग होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात त्याच इस्पितळात कामासाठी आलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की त्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पाहिलं. याशिवाय त्याच्या एका सहकाऱ्यानेही दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी कर्मचाऱ्याने केली. असं असलं तरी या रुग्णांचा मृत्यू करोना किंवा इतर कोणत्या आजाराने झाला याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला.
एका परिचारिकेने सांगितले की, क्वारंटाइन सेंटरमध्ये जाण्यापूर्वी ती या इस्पितळात काम करायची. त्यांनी सांगितले की, नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. शांघाय सरकारने पाठवलेले वैद्यकीय कर्मचारी आणि तज्ज्ञांनाही संसर्ग झाल्याचा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, सुरुवातीला आम्ही नेहमीप्रमाणे काम करत राहिलो, पण नंतर त्यांनी प्रत्येक विभाग बंद करण्यास सुरुवात केली. तेव्हा आमच्या मॅनेजरने सांगितले की परिस्थिती खूप वाईट होत आहे. असे बरेच रुग्ण होते जे मास्क घालण्यासही नकार देत होते.

Leave a Reply