आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती बिकट, आणीबाणी लागू

नवी दिल्ली : २ एप्रिल – आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती बिकट बनली आहे. बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा देशात आणीबाणी जाहीर केली आहे. देश सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या संकटातून जात आहे. श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. या रांगेत वृद्धांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पेट्रोल पंपावर सैन्यदल तैनात करण्यात आले होते. त्यातच आता श्रीलंकेत विजेची देखील टंचाई निर्माण झाली आहे. लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. पेपरच्या तुटवड्याभावी येथील परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. सर्व परिस्थिती पाहून अखेर श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा देशात आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तानुसार आणीबाणीबाबत बोलताना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी म्हटले आहे की, सध्या आपण एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहोत. मात्र त्याचवेळी देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणीबाणी सारखा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. दरम्यान त्यापूर्वी शुक्रवारी रात्री श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनांना दहशतवादी कृत्य ठरवण्यात आले असून, त्यासाठी विरोधी पक्षच जबाबदार असल्याचे गोटाबाया राजपक्षे यांनी म्हटले आहे.
सध्या श्रीलंका एका मोठ्या संकटातून जात आहे. देशात आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिक आक्रमक झाले असून, रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात हिंसक निदर्शने होत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून, नागरिकांनी वाहनांची जाळपोळ सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. त्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply