निर्धार करा आगामी निवडणुकीत आपले मत आरक्षणवाद्यालाच – प्रकाश आंबेडकर

अहमदनगर : ३१ मार्च – आमचं आरक्षण घालविणाऱ्या लोकांना आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणार नाही, आमचं मतदान आरक्षणवाद्याला असेल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
मढी (ता. पाथर्डी) येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित आदिवासी, भटक्या विमुक्त समाजाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अँड. आंबेडकर बोलत होते. आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, प्रा. अंजली आंबेडकर, शिबिराचे स्वागताध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अँड. डॉ. अरुण जाधव, प्रा. विष्णू जाधव, केशव मुद्देवाड, डॉ. धर्मराज चव्हाण, बालाजी शिंगे, अनिल मोरे, दगडू गायकवाड, मोहन राठोड, द्वारका पवार, डॉ. जािलदर घिगे आदी उपस्थित होते.
अँड. आंबेडकर म्हणाले, की इथल्या राज्यकर्त्यांनी ओबीसी, मुस्लीम, भटके विमुक्त समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावर ताकदीने आपले मत मांडले पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले मत आरक्षणवाद्याला हे ज्या दिवशी आपण ठरवू, त्या दिवशी आपल्याला कोणासमोरही झोळी घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. आगामी निवडणुकीत आपण सत्ता काबीज करून विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आतापासूनच प्रचाराला लागा, असे आवाहन त्यांनी केले. आज ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले, उद्या शैक्षणिक आरक्षण गेले तर काय होईल? आपला हा लढा उद्याच्या पिढीला स्वतंत्र ठेवण्याचा आहे. हा स्वत:चा लढा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध होऊ आणि आरक्षणवाद्यालाच मतदान करू, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल छाया भोसले व संतोष भोसले, आंतरजातीय विवाह करणाऱ्या आदिवासी व बौद्ध समाजातील दोन दाम्पत्यांचा अँड. आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply