अँडव्होकेट सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा, सतीश उकेंना घेतले ताब्यात

नागपूर : ३१ मार्च – नागपूरचे नावाजलेले वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज छापा टाकाला होता. पहाटेपासून चौकशी केल्यानंतर अखेरीस ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश उके हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टरविरोधक समजले जातात. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरमध्ये आता सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक उकेंच्या घरी पोहोचले. पहाटेपासून त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. सकाळपासून उके यांची चौकशी करण्यात आली होती. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. घरी चौकशी झाल्यानंतर ईडीने उकेंना ताब्यात घेतले आहे.
सतीश उके हे कट्टर देवेंद्र फडणवीस विरोधक मानले जातात. उके यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. अनेक प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एवढंच नाहीतर जस्टिस लोया प्रकरण, निमगडे हत्याकांड, चंद्रशेखर बावनकुळे भ्रष्ट्राचार प्रकरण या संदर्भात त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते, त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील होते. त्यातूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
सतीश उके हे पार्वतीनगर भागात राहतात. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सतीश उके आणि त्यांचे भाऊ हे घरीच आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने उके यांनी जमीन व्यवहाराबाबत नोटीस बजावली होती. या प्रकरणातून छापा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी संजय राऊत आणि सतीश उके यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी फोन टॅप प्रकरणात नाना पटोले यांची केस लढवली आहे. फडणवीस यांच्याविरोधात 2014 मध्ये प्रतिज्ञापत्रात दोन खटले लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे उके आणि भाजप आमनेसामने आले होते.

Leave a Reply