संपादकीय संवाद – भाजपवर खोटारडेपणाचा आरोप करताना तुम्ही किती खोटे बोलता आहेत हे नाना पटोलेंनी तपासायला हवे

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे एक बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. मनाला येईल ते बोलून मोकळे व्हायचे, खरेखोटे नेमके काय आहे हे तपासत बसायची भानगड नको, पुढचे पुढे पाहता येईल असा त्यांचा प्रकार आहे. त्यानुसार आज ते असेच बिनधास्त बोलून गेले आहेत.
आज माध्यमांशी बोलतांना नानांनी भाजपवर टीकेची झोड उठवली, भाजपवाल्यांनी खोटे बोलण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असल्याची टीका त्यांनी केली. असे खोटे बोलायला भाजप वाल्यांची जीभ तरी कशी धजावते असा सवालही त्यांनी केला. ही टीका करण्यासाठी कारण झाले ते इंधनाच्या दरवाढीचे. भाजपवाले पेट्रोल दरवाढीबद्दल बोलल की काँग्रेसने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले अशी टीका करतात हे धादांत खोटे असून भाववाढ भाजपच्याच काळात होत असल्याचा दावा नानांनी केला आहे.
खोटे बोलायला तुमची जीभ कशी धजावते? हा प्रश्न आता खरे तर नानांनाच विचारायला हवा. नानांनी मुद्दा उपस्थित केला आहे तो पेट्रोल डिझेल दरवाढीचा, त्यांचे म्हणणे असे की पेट्रोल दरवाढ फक्त भाजपचंच काळात होते. काँग्रेसने दरवाढ केली हा भाजपचा दावा चुकीचा असल्याचा मुद्दा नाना उपस्थित करत आहेत.
पंचनामाने याच मुद्द्याचा पंचनामा करायचा ठरवला. नानांचा जन्म १९६३ सालाचा, त्यावेळी पेट्रोल अगदी नाममात्र दरात मिळायचे. पंचानामाने मिळवलेल्या माहितीनुसार १९७० साली पेट्रोलचा भाव ४१ नवे पैसे प्रति लिटर इतका होता. त्यावेळी काँग्रेसचेच सरकार होते, हा दर वाढत वाढत १९७३ च्या डिसेंबर महिन्यात ३ रुपये १० पैसे प्रति लिटर इतका झाला, तेव्हा अनेकांनी स्कुटर चालवणे बंद करून कार चालवणे सुरु केले होते. १९८१ च्या दरम्यान हा दर पाच रुपये लिटरपेक्षा अधिक होता तेव्हाही काँग्रेसचेच सरकार होते. १९९१-९२ च्या दरम्यान हा दर प्रति लिटरला १० रुपयांपेक्षा अधिक झाला होता, तेव्हाही काँग्रेसचेच सरकार होते. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ८० रुपयाच्या आसपास गेला होता, नंतर मोदी सरकार आल्यावर काही काळ हा दर ७० रुपये प्रति लिटरपेक्षा कमीही झाला होता. आज हा दर ११५ रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचला आहे.
ही सर्व माहिती लक्षात घेता ४१ पैसे प्रति लिटर पासून तर ८० रुपये प्रति लिटर इथपर्यंतची जवळ जवळ २०० टक्के दरवाढ ही काँग्रेसच्याच काळात झाली आहे. त्या तुलनेत भाजपने केलेली वाढ दीडपटीपेक्षाही कमी आहे, काँग्रेसने २०० टक्के दरवाढ केली याकडे नाना पटोले सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात आणि भाजपच्या काळात दीडपटीने दरवाढ झाली त्याबद्दल भाजपला दोषी ठरवतात आणि काँग्रेसने दरवाढ केली हे कधीच मान्य करत नाहीत, आणि भाजपने तास आरोप केला तर भाजपवाले खोटे बोलत असल्याचा आरोप नाना करतात हा सर्व प्रकार एकविसाव्या शतकातला मोठा विनोदचं म्हणावा लागेल.
या प्रकारात खरा खोटारडेपणा नाना आणि त्यांचा काँग्रेस पक्ष करतो आहे. आणि त्याच वेळी आम्ही खरे आणि तुम्हीच खोटे असा कांगावाही नाना सोयीस्कररीत्या करत आहेत. नानांना वाटते की आम्ही जनतेला सहज मूर्ख बनवू शकतो, मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही, जनता शहाणी झाली आहे, म्हणूनच जनतेने काँग्रेस पक्षाला त्याची जागा २०१४ आणि २०१९ मध्ये दाखवून दिली आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता नाना आणि त्यांच्या काँग्रेस पक्षांनी कितीही कांगावा केला तरी देशातील जनता आता फसणार नाही हे निश्चित झाले आहे. जनता आता शहाणी झाली आहे. १९४७ पासून तर २०१४ पर्यंत तुम्ही देशातील जनतेला थापा देत सत्ता मिळवली , देशात तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रचंड महागाई वाढली, त्याचाच परिणाम आज जनता भोगते आहे, तुमच्या जन्माच्या वेळी या देशात साखर ५० पैसे किलो भावाने मिळायची, आज साखरेचा भाव काय? हे तुम्हाला माहित नसेलही मात्र घरी वहिनींना विचारा आणि इतका भाव वाढण्याला कोण कारणीभूत ठरले याचा शोध घ्या, मगच कोण खरोखरी खोटे बोलत आहे ते तुम्हाला कळेल तेच तुमच्या दृष्टीने उचित राहील.

अविनाश पाठक

Leave a Reply