महिला कंडक्टर दीप दास हिच्या हत्येचा अखेर उलगडा

नागपूर : २९ मार्च – शहरात एकामागून एक होणाऱ्या हत्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. एका स्कूल बसवर कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला कंडक्टर दीपा दास (४१) यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत झाडझुडपाच्या लगत असलेल्या मैदानात फेकलेला दिसून आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास हाती घेत दीपाची मैत्रीण आणि तिचा पती यांना अटक केली आहे. बचतगटाच्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुवर्णा सोनी व सामी सोनी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्मथनगरातील रहिवाशी दीपा जुगल दास या जैन स्कूलच्या बसवर कंडक्टर म्हणून कामावर होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे पती हे स्टील कंपनीत कामावर आहेत. बसमध्ये कंडक्टरचे काम करतानाच दीपा या बचत गटाचा आर्थिक व्यवहारही सांभाळत होत्या. दरम्यान, शनिवारी त्या नेहमीप्रमाणे शाळेच्या बसमध्ये कामावर गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास बसचालकाने त्यांना कुशीनगर येथे उतरविले. त्यानंतर दीपा या सुवर्णा यांच्या घरी पोहोचल्या. परंतु, येथून नंतर त्या कुणालाही दिसून आल्या नाही. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेह हा रविवारी सकाळी ८.३0 च्या सुमारास कपिलनगरातील एसडीपीएल सोसायटी, उप्पलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर आढळून आला. फ्रिजच्या प्लास्टिकमध्ये हा मृतदेह गुंडाळून असल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांनी दीपाचे शेवटचे लोकेशन शोधत सुवर्णा यांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. परंतु, सुवर्णा ही पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला वेगळ्या मार्गाने विचारणा केली असता तिने अखेर हत्या केल्याचे कबूल केले. सुवर्णाने तिच्या पतीसोबत मिळून हे कृत्य केल्याची तिने कबुली दिली.
या प्रकरणी सूत्रांच्या माहितीनुसार, बचतगटाचे पैसे सुवर्णा व तिचा पती हे परत करण्याकरिता टाळटाळ करीत होते. परिणामी, यावरून त्यांच्यात वाद होता. शनिवारीदेखील दीपा सुवर्णाच्या घरी आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यानंतर वाद वाढून हाणामारी झाली. यावेळी सुवर्णा आणि तिच्या पतीने ओढणीच्या साहाय्याने दीपाचा गळा आवळत तिला ठार मारले. त्यानंतर दीपाचा मृतदेह हा प्लास्टिकमध्ये गुंडाळून तो फ्रिजच्या खरड्याच्या बॉक्समध्ये टाकला. त्यानंतर ई-रिक्शातून रात्रीच्या वेळी मृतदेह उपरोक्त ठिकाणी फेकला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply