सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

त्रिमितीय

कर्तव्यनिष्ठ संन्यासी योगी आदित्यनाथ. पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. ज्या संन्याशाला आमच्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्याने “भोगी” संबोधले होते. त्याने पाच वर्षांतील जबरदस्त विकासपुर्ण कारकीर्द पुर्ण केली. उत्तर प्रदेशातील बडे बडे तुर्रमखां गजाआड केले. सर्वसामान्य जनतेला दिवसांतील चोवीस तास बिनधोक, बिनधास्त कुठे ही फिरा. तुम्ही सुरक्षित आहात ही भावना व परिस्थिती आणून ठेवली आणि भोगी म्हणणाऱ्या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना दाखवून दिले की संन्यासी सत्ता आल्यावर राज्य कसे सुरळीत चालवू शकतो. एक हाती सत्ता परत आणण्याचे कसब लाभलेला मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला छप्पन भोगा चा नैवेद्य दाखवित विराजमान झाला. असे आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परत होवू शकणार का? सहज मनात विचार आला!
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – कार्टुनिस्ट अतिशय कुशल कार्टुनिस्ट. रेषांचा खेळ. कुठली रेष खालून अर्धगोलाकार केली की हास्य निर्माण करणार आणि वरुन अर्धगोलाकार केली की रडवेला चेहरा करणार. त्यांचे कार्टुन त्या काळचे फार गाजलेले जसे “मराठा तितुका मेळवावा” जेव्हा हॉटेल ओबेरॉय मध्ये परप्रांतीयांचा भरणा करण्यात आला. १९६४ महागाई ने गरीबांची दुर्दशा, अवकळा. पंचशील दिवाळी – नेहरू आणि क्रिष्णा मेनन जेव्हा ह्या दोघांनाही चीनच्या झोहु इनलाइ ने मुर्ख बनविले होते. “गरीबी हटाव” चा नारा देणारी इंदिरा गांधी ह्यांची शाही मिरवणूक. “नाकी नऊ आले” ज्यावेळी नऊ कॉंग्रेसेतर राज्यसरकारे आली. इंदिरा गांधींच्या नाकावर नऊ कॉंग्रेसेतर मुख्यमंत्री बसलेले अफलातून, अप्रतिम कार्टून. शिवाय “मराठी माणूस” हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता प्रांत. मराठी माणसाने विश्वविख्यात व्हावे, मराठी माणसाने यशाची शिखरे काबिज करावी यासाठी त्यांची चाललेली धडपड. आणि हिंदू लोकांसाठीचा कळवळा – त्यातून उभी राहिलेली अफाट कर्तृत्वाची अचाट शिवसेना. ज्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला १२ लाख लोक जमा झाले होते. त्यांचे कर्तृत्व, मर्दानगी काय असेल की बारा लाख लोकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावावी आणि जगातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ह्याची नोंद व्हावी. जगताना बिनधास्त आयुष्य जगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. दिलीप कुमार बरोबर बियर प्यायचो हे जगाला बेफिकीर पणे तोंडात सिगार पकडून सांगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अमिताभ बच्चन ला स्वतः च्या घरात ठेवून त्याचे आणि कुटुंबियांचे संरक्षण करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.
राजकारणी म्हटल्यावर दोस्ती सर्वांशी पण प्रत्येकाची पायरी ठरवून ठेवलेली. शरद पवारांच्या गाडीचा चालक सांगतो की पवार साहेबांनी गाडीत बियर चा क्रेट टाकला की कळायचे आता इथून थेट प्रस्थान हिंदू हृदय सम्राटांकडे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध घरोब्याचे. सुप्रिया सुळेंना राजकारणात आणताना शरद पवारांना बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मदत केलेली. पण शरद पवारांना कुठपर्यंत आत येवू द्यायचे, शरद पवारांबद्दल त्यांचे अंदाज, कयास बांधुन ठेवलेले. त्या चाकोरी बाहेर त्यांनी शरद पवारांना महत्व दिले नाही. मित्रवर्य म्हणून शरद पवार ठिक आहेत पण विश्वासार्हता नाही. असे त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप सांगतात. प्रसंगी भाषणात शरद पवारांचा उल्लेख त्यांनी “बारामतीचा ममद्या” “मैद्याचं पोतं”असा देखील केला आहे.
हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाणी म्हणाल तर समोरच्यांच्या तोंडाला फेस आणणारी. एकदा वक्तव्य केले की त्याची नोंद भारतभरात घ्यायला भाग पाडणारी. लांड्यांबद्दल बोलले तर भारत काय तर पाकिस्तानातील मुसलमांनांच्या लांडे पायजामे नाडे न खोलता पायजामे ओले करणारी रणभेदी डरकाळी.
श्री संत पाचलेगावकर महाराजांचा आशीर्वाद लाभलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. महाराजांचे आणि बाळासाहेबांचे कार्य दिशा एकच्. हिंदू रक्षण आणि मुसलमानी वृत्तीचा बिमोड. श्री संत पाचलेगावकर महाराजांचा आशीर्वाद म्हणजे ते गळ्यात जिवंत कोब्रा सापाचा हार घालित असत. तसे फोटो देखील आहेत. त्यातील एक फोटो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १९९५ साली नागपूर च्या श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम सोमलवाडाने, भेटीदाखल दिला आहे.
एक हिंदू नेता तयार करायला संतगणांना, भगवंताला धर्म टिकविण्यासाठी बरेच् परिश्रम घ्यावे लागतात. त्यातील एक महान विभूती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी भले मोठे हिंदू साम्राज्य उभे केले पण त्यासाठी लायक नेता पुढल्या पिढीला देवू शकले नाही. राज ठाकरेंनी जर कमान सांभाळली असती तर आज शिवसेना जास्त संयुक्तिक परिस्थितीत असती. मामु ( माननीय मुख्यमंत्री) उद्धव ठाकरे ह्यांना फोटोग्राफी मध्ये रस. राज ठाकरे तर लहानपणापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बरोबर फिरलेले. त्यांचे राजकारणातील बारकावे जवळून बघितलेले. राजकारणात “वेळेला” (timing) महत्व फार. हे सर्व श्री राज ठाकरे ह्यांचे नाव जर समोर आले असते तर निश्चितच शिवसेनेचा आजचा राजकारणातील भागिदारी एका वेगळ्या स्तराची राहिली असती. मात्र पुत्र प्रेमाने बराच सत्यानाश होतो पण तो देखील घराण्याच्या नियतीचा एक भाग म्हणून हिंदू लोकांनी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या संघटनेचे शीर्ष नेतृत्व एकहाती तुमच्यावर जबाबदारी येते. त्यावेळी वेळीच घेतलेले योग्य निर्णय संघटनेला तारक ठरतात. भविष्याचे वेध घेत यशस्वी निर्णय ठरतात. मात्र तुमचा “पिंड” राजकारणी विचारसरणीचा पाहिजे. अन्यथा तुम्ही घेतलेले निर्णय संघटनेचे वासे फिरवणारे ठरु शकतात.
युक्रेन देशाचे उदाहरण बघा. एका विनोदी अभिनेत्याला देशाच्या उच्चपदी विराजमान केले. अरे! ज्याचा पिंडच् मुळी अभिनेत्याचा. डायरेक्टर सांगेल तसा अभिनय करण्याचा. त्याला नाटो, अमेरिकेचे, युरोपातील राजकारण काय डोंबलं कळतंय? पण लोकांचा आवडता अभिनेता म्हणून अफाट लोकप्रियता लाभलेला “झेलेन्स्की” राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाला. नाटो, अमेरिका, युरोप ची चाली न समजलेला विनोदी नट युक्रेन ला मार्गदर्शन करु शकला नाही. रशियाचे वारे, वाऱ्याची दिशा जोखु शकला नाही. परिणामी आज युक्रेन स्मशानवत झाले आहे. “खंडहर” हा शब्द आता प्रसारमाध्यमे वापरतात एका एका युक्रेनी शहरासाठी. मराठी प्रसारमाध्यमे “बेचिराख” हा शब्द वापरतात. ज्याच्या हाती जोखिम दिली, जबाबदारी दिली तोच् निवडून दिलेला दादला, युक्रेन देश वाचवायला असमर्थ ठरला.
आज ही परिस्थिती”शिवसेना” नेतृत्व ह्याच् परिस्थितीतून जात आहे. फक्त मुख्यमंत्री पदाचा पाट मिळविण्यासाठी केलेला अट्टाहास , भविष्यात तुम्हाला काय देणार? वेळीच खबरदारी घेतली गेली नाही. राजकारणाला “अहंकारी” दृष्टीने महाराष्ट्रात जास्त महत्त्व दिल्या गेले. शिवसेनेचा संपादक श्री संजय राऊत हे निवडणूक पुर्व देखील शरद पवारांच्या संपर्कात असावेत. भावनेच्या भरात परिस्थिती भडकावून, परिस्थिती चा उद्रेक पथ्यावर पाडून घेत, भविष्याचा वेध न घेता एक अपरिपक्व राजकारण खेळले गेले आणि शिवसेनेचा युक्रेन होणार हे निश्चित झाले.
मिळालेले राज्य जर खरोखर महाराष्ट्र जनता त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केले गेले असते तर कदाचित आज मविआ सरकार डौलात खंबीर असती. मात्र ढवळ्या शेजारी बांधला पवळा – गुण नाही पण वाण लागला. अशी परिस्थिती आहे. तुमची संस्था कोणाबरोबर कार्यरत आहे. त्याचे गुणदोष निश्चितच तुमच्या कडे येणार. पण वेळीच सांभाळायचे सामर्थ्य असेल तर तुमचे नेतृत्व कुशल मानले जाते आणि नसेल तर मेहुण्याच्या घरात घरगडी आल्यावर घराबाहेर पडावे लागते. मुख्यमंत्री पदी विराजमान व्यक्ती महिनोन्महिने घरात कसा राहू शकतो? ह्यावरून मानसिकता लक्षात येते. पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यावर राजकारणाचा कुठलाही अनुभव नसणारा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी २००२ दंगे समर्थपणे पेलली होती, भुकंप २६ जानेवारी २००१ आणि भुकंपाची तिव्रता ६.९ इतकी सुमारे २०००० लोक मृत्युमुखी पडले तर १६००० लोक जखमी झाले. दोन्ही परिस्थितीत मुख्यमंत्री पदाला साजेसं वर्त़न, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला मानवंदना देत, प्रसंगी योग्य वा कठोर निर्णय घेत, प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतला आणि परिस्थिती आटोक्यात आणली. गुजरात मध्ये होणारे दंगे बंद केले. मुसलमान समाजाला योग्य जगण्याचे साधन दिले. निस्वार्थ बुद्धीने जे जनतेला हवे आहे, जे राज्याला हवे आहे ते योग्य निर्णय योग्य वेळी घेतले गेले परिणामी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले.
असे आमची शिवसेना पक्षप्रमुख परत सलग दुसऱ्यांदा निवडून येणार का?
धृतराष्ट्राच्या मंत्रिगणात सामिल “संजय” हे पात्र अजरामर झाले ते त्याला दिल्या गेलेल्या “दिव्य दृष्टी” मुळे. जातिने विणकर “संजय” हा महाभारत युद्धात कुठे कुठे काय चालू आहे ह्याचे धावते समालोचन करणारा धृतराष्ट्राचा समालोचक. जिथे जिथे”संजय” नाव येणार तिथे तिथे युद्धात पराभव निश्चित. असे काही समीकरण आहे का?
सुरुवातीला नारायणी सेना महाभारतात अग्रगण्य मानली जायची. ज्याच्याकडे नारायणी सेना तो हारू शकणार नाही हे समीकरण होते. महाराष्ट्राच्या राजकारणीय महाभारतात देखील १६९ सीटांचा धनी हा नारायणी सेनेसमान मानला गेला. त्यावेळी होणाऱ्या सकाळी सकाळी च्या प्रेस कॉन्फरन्स बघा संजयच्या. पत्रकारांसमोर असणारी संजयची देहबोली बघा. असे वाटायचे जणू जग जिंकले. सत्ता हस्तगत केली त्यावेळी चेहऱ्यावरचा देहबोली वजा विजयोन्माद बरेच काही सांगून जायचा. महाभारतात धृतराष्ट्राच्या विरोधात कान्हा होता जो सर्व दृष्टीने अभेद्य होता. नियती त्याच्या हातात होती तर युद्ध जिंकुन देणारे परिपक्व सामर्थ्य असणारा “कान्हा” तर इकडे “देवेंद्र” जो विरोधी पक्षनेता, ज्याला सरकारी यंत्रणेची खडा न् खडा माहिती. सरकारी यंत्रणा कशी वापरायची ह्याची प्रगल्भ जाण. आणि अपमानाचा बदला घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती.
महाराष्ट्राच्या संजय ची देहबोली आता बदलू लागलेली. आमच्या मागे ईडी, सीबीआय चा ससेमिरा लावताय असे म्हणून खट्टू चेहरा करणारा संजय. आपल्या दोन मुलींची नावे ” वाईनरी” चे संदर्भात जगजाहीर झाली ह्याचा सल मनात असणारा संजय. हाती सत्ता आल्यानंतर त्याचा बहुतेक दुरुपयोग करणारा संजय! मी काही चुकीचे लिहिले का? नाही. सप्ततारांकित हॉटेल मध्ये लग्न लावायचे तर खानदानी धंदेवाईक माणसे लावू शकतात. घाम गाळून कमावलेला पैसा असेल तर सप्ततारांकित हॉटेल मध्ये खर्च करणार नाही. फुकटाचा ऐठलेला पैसा असेल तर कदाचित सप्ततारांकित हॉटेल मध्ये लग्न व्हायला हरकत नाही. म्हणून आपले म्हटले. ह्या संजयने परत ५०-५२ लाख पत्नीचे नावे घेतलेले बिन व्याजी पैसे देखील परतवले होते. एकदा उच्चपदी विराजमान झाले की बिनव्याजी कर्ज, ५०-५२ लाख , सप्ततारांकित हॉटेल मध्ये लग्न ही सगळी खर्चावळी छोट्टी छोट्टी वाटायला लागते. तर असो! आताशा ह्या संजयच्या देहबोलीत फरक पडलेला. ईडी, सीबीआय चा ससेमिरा असे काही से बरळायला लागलेला. हम भी देखेंगे! अशा धमकीमध्ये तोंड पाडून बसलेल्या देहबोलीतून प्रगटणारा संजय. फक्त दुसऱ्याचे उणे शोधणारा संजय दिसायला लागला. कधीमधी पत्रकार परिषद घेऊन १९ बंगल्यांचा उल्लेख करुन, साहेबांना पण ओढा हो भ्रष्टाचार प्रकरणात! असे आडून सुचवणारा संजय! सत्ता, पॉवर, पैसा ह्यात मतांध झाले की आपली बाजू खरी वाटायला लागते. संजय हे विसरला की “ज्याचे घरी ईडी चे पाय त्या शिवसेनासुताकडे पैसा अफाट” सापडतोय. आणि केसेस कोर्टाकडून दिलासा मिळत नाही. अशावेळी आपले घर सुधरवायचे दिले सोडून, घेतल्या निर्णयाचा झाला पश्चात्ताप सोडून फक्त विरोधकांवर टीका करण्याचे धोरण, चिखलफेक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यातून निष्पन्न काही होणार नाही. तिकडे वकील बाबू देवेंद्र कायद्याचे ज्ञान असणारे भाजपा नेतृत्व मात्र मविआ सरकारला पदोपदी तोंडघशी पाडतंय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घरात बसून रेघोट्या ओढतोय. अरे! हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घरबसल्या रेघोट्या ओढायचे ते कार्टून जगप्रसिद्ध व्हायचे. पण तुम्ही गळ्याला पट्टा लावून सहा सहा महिने घरात? सर्वसामान्य घरात घरधन्याला जाव लागतं कमवायला नाही तर त्याचं घर उपाशी झोपतं. तशी भ्रांत तुम्हाला नाही. तुम्हाला भ्रांत आहे ती आपल्या साळ्याची. आमदार पळून जायला नको म्हणून आमदारांना स्वस्तात घरं वाटायची. सरनाईकांचे नाव २५० कोटी च्या NSE घोटाळ्यात आले. रिक्षावाला ते आमदार – ह्याची कारकीर्द किती? आणि आमदार झाल्यावर ११.५ कोटी ची मालमत्ता जप्त? आणि अशा आमदारांना मुख्यमंत्री साहेब ३०० घरं देणार! अरे! कुठे चाललाय महाराष्ट्र माझा!
योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. मोदी पुन्हा मुख्यमंत्री झालेत आता दुसऱ्यांदा पंतप्रधान पण झालेत. अफाट हिंदू धर्म संस्कार, जनतेप्रती सहानुभूती, जनतेचे प्रश्न सोडविण्याची हातोटी, निस्वार्थ सेवाभावी स्वभाव आणि आंतरराष्ट्रीय पटलावर विश्वगुरू होण्याची मानसिकता म्हणून सत्तेवर जनतेनी बसविले. ओढून ताणून बसलेले नाही. पण ह्या सर्व गोष्टींचा अभाव असणारा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. हव्यासापायी एकदा मुख्यमंत्री पदाची लालसा पुर्ण केली. मुख्यमंत्री पदालायक लायकी नसताना, मुख्यमंत्री पद गळ्यात बांधले. (हे सर्वसामान्य जनतेचे मत) आता ह्या पुढे हा माजी मुख्यमंत्री झाल्यावर जन्मभर कुठल्यातरी पक्षाच्या मांडलिकत्वाचा ताईत घालून फिरणार आणि हाजी हाजी करत फिरणार, चहुबाजूंनी विचार केला. ह्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवता येवू शकते का? सगळे कोपरे न न्ना चा पाढा लावताहेत. म्हणताहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कार्टुनिस्ट होते त्यांचे द्विमितीय कार्टून पेपरमध्ये छापून येत असत हा त्रिमितीय एकदा परिक्षा घेण्यासाठी ठेवला आहे. पाहायचे ह्याला राजकारणाच्या मतदानात जनता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवते का? तुर्तास तरी बाळासाहेब म्हणत असतील मी असतो तर ह्याला नापास दर्जा दिला असता.

भाई देवघरे

Leave a Reply