संपादकीय संवाद – विधिमंडळात होणारी मारामारी देशाला अराजकाकडे घेऊन जाणारी ठरेल

पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज जे काही घडले, ते एकूणच दुर्दैवी प्रकार म्हणूनच संभावना करण्याजोगे आहे. विधानसभा किंवा विधानपरिषदांच्या जिथे बैठक होतात, त्याला सभागृह असे म्हटल्या जाते. सभ्य गृहस्थांचे गृह ते सभागृह असाही सभागृह या शब्दाचा अर्थ काढला जातो. सभागृहातील सर्वच सभ्य गृहस्थांनी हाणामारीवर उतरावे आणि एकमेकांचे कपडे फाडावे हे सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणारे असेच म्हणता येईल.
याला कारण झाले ते पश्चिम बंगालमध्ये बिरभूमी येथे झोपड्या जालन्याचे प्रकरण, या प्रकरणात काही निरपराध व्यक्ती जळून मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हात असल्याचे बोलले जाते आहे. या प्रकरणात बंगाल सरकार बरोबर चौकशी करत नसल्यामुळे विरोधक उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय कडे सोपवले आहे. ही घटना घडल्यामुळे विरोधक संतप्त आहेत, तर सीबीआय चौकशीमुळे तृणमूल काँग्रेस संतप्त आहे. त्यातूनच आजचा हा प्रकार घडला आहे.
भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाहीत सर्वच प्रश्न चर्चेतून सोडवायचे असतात, मात्र चर्चा बाजूला ठेवत अश्या प्रकारे गुद्दागुद्दीवर येणे हे लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारे आहे. मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर चर्चा होत असताना सत्ताधारी आमदार विरोधकांवर धावून गेले, हे जर खरे असेल तर हे चुकीचेच आहे. यात तृणमूल निर्दोष असेल तर कितीही आरोप झालेत, तरी ते त्यातून बाहेर येतील त्यासाठी मारामारी करण्याचे काहीच कारण नाही.
असे असले तरी सदनात मारामारी होते हे वास्तव नाकारता येत नाही. हे चुकीचेच आहे त्यामुळे जबाबदार कुणीही असले तरी असे प्रकार पहिले थांबतील कसे याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशी काळजी घेतली नाही तर उद्या सभागृहात रोजच मारामारी होईल आणि मग बळी तो कान पिळी हा न्याय सुरु होईल, असे झाले तर ते लोकशाहीला मारक ठरेल ही नव्या अराजकाला निमंत्रण देणारी परिस्थिती असेल याची जाणीव सर्वानीच ठेवयला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply