वाघाच्या गळ्यात अडकली शिकारीच्या जाळ्यातील तार

यवतमाळ : २८ मार्च – तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात एक वाघ अडकला. मात्र, त्या वाघाने ते जाळे तोडून पळ काढला; पण या संघर्षात त्या वाघाच्या गळ्यात जाळ्याची तार अडकल्याने तो जखमी झाला आहे. गळ्यात अडकलेली ती तार घेऊनच हा वाघ जखमी अवस्थेत अभयारण्यात फिरत आहे.
या जखमी वाघाच्या गळ्यातील तारांचा फास काढण्यासाठी अमरावती येथील बचाव पथक सुमारे आठ दिवसांपासून या अभयारण्यात गस्त घालत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची नेहमीच शिकार करण्यात येते. अभयारण्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सातत्याने शिकारीच्या घटना घडत आहेत. वन्यप्राण्यांची शिकार करून त्यावर ताव मारणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठ दिवसांआधी एका पर्यटकाला अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आले. याची माहिती टिपेश्वरच्या अधिकार्यांना देण्यात आली. अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्यामध्येसुद्धा एका वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. टिपेश्वरच्या पाटणबोरी रेजंमधील एदलापूर व पिलखान बिटमध्ये हा जखमी वाघ आढळून आला होता. त्याचा वावरदेखील या दोन बिटांतच आहे. परंतु, अद्यापही बचाव पथकाच्या हाती लागत नाही आहे.
टिपेश्वर अभयारण्य किंवा लगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात येते. अशाच एका तारांच्या जाळ्यात तो वाघ अडकला. याबाबत माहिती मिळताच, अभयारण्याच्या अधिकार्यांनी हालचाली सुरू केल्या. १७ मार्च २0१९ रोजी तार गळ्यात अडकलेल्या टी-४ या जखमी वाघिणीला बेशुद्ध करण्याकरिता ट्रँक्युलाईझ गणद्वारे डॉट मारण्यात आला होता. परंतु, ती बेशुद्ध होण्याआधीच तिला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्या वाघिणीने आश्विन बाकमवार व इरफान शेख या दोन मजुरांवर हल्ला केला होता. यावेळी त्यांना वाचविण्याकरिता झालेल्या झटापटीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते. राजकीय दबावापोटी त्याची चौकशीसुद्धा त्यावेळी थंडबस्त्यात ठेवण्यात आली होती.

Leave a Reply