लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भंडारा : २८ मार्च – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चप्राड येथे उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गर्भवती झाल्याचे पाहुन 18 वर्षीय आरोपी युवकाने लग्नास नकार दिल्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी या युवकाविरोधात अत्याचार व पोक्सोसह अँट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून 27 मार्च रोजी लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंकुश हजारे (रा. चप्राड) असे घटनेतील आरोपी युवकाचे नाव आहे. आरोपी अंकुश हजारे याने गेल्या काही महिन्यापूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते.
यावेळी आरोपी युवकाने अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष देत 5 महिन्यांपासून नियमित अत्याचार केल्याने अल्पवयीन पीडिता गरोदर राहिली. तथापि गर्भधारणा झाल्याने घटनेतील पीडित बालिकेने आरोपीला लग्नाची गळ घातली.
यावेळी आरोपीने गर्भवती अल्पवयीन बालिकेशी लग्नास नकार दिल्याने पीडित बालिकेने घटनेची कुटुंबीयांना माहिती दिली. अल्पवयीन बालिका गर्भवती झाल्याचे माहिती होताच कुटुंबीयांनी बालिकेसह लाखांदूर पोलिसात धाव घेत आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली. सदर तक्रारिवरुन लाखांदूर पोलीसांनी आरोपी युवकाविरोधात अत्याचार व पोक्सोसह अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लाखांदुर पोलीस करीत आहे.

Leave a Reply