पाच लाखाची लाच घेणारे दोन पोलीस शिपाई निलंबित

नागपूर : २८ मार्च – सुगंधित तंबाखूचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रुपये उकळणाऱ्या कळमना पोलिस ठाण्यातील दोन शिपायांना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे. सचिन दुबे आणि दिनेश यादव अशी या शिपायांची नावे आहेत. सुगंधित तंबाखूचे वाहन पकडून संबंधित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची तोडी करणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले.
८ मार्च रोजी कळमना हद्दीत सचिन दुबे याने सुगंधित तंबाखूचा ट्रक पकडला होता. हा माल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यांचा होता. अग्रवाल यांना ही माहिती समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी दुबे याने तोडपाणी करण्यास सुरुवात केली. तसेच कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची मागणी केली. अग्रवालने दोन लाख देऊन ट्रक सोडवून घेतला.
दोन लाख घेतल्यानंतरही सचिनला आणखी पैसे मागण्याची लालच सुटली. त्याने ही माहिती दिनेश यादवला दिली. दिनेशने ट्रकचा पाठलाग करून पुन्हा ट्रक पकडले. दिनेशने अग्रवालकडून तीन लाख रुपये उकळले. अशाप्रकारे दोन्ही शिपायांनी वरिष्ठांना काही माहिती न देता पाच लाख रुपये उकळले. तसेच कोणतीही कारवाई न करता ट्रक सोडून दिला. वरिष्ठांपासून ही लपवून ठेवली. या प्रकाराची माहिती परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांना समजताच त्यांनी कळमन्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोन्ही शिपायांनी वरिष्ठ अधिकार्यांना माहिती न दिल्याचे व पैसे उकळल्याचे पुढे आले. तसा अहवाल कलवानिया यांच्याकडे सादर केला. त्यानंतर या शिपायांना निलंबित करण्यात आले.
याप्रकरणी कारवाई झालेला दिनेश यादव हा पूर्वी परिमंडळ ५ पोलिस उपायुक्तांच्या पथकात कार्यरत होता. मात्र, रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांसोबत त्याने हातमिळवणी केल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्याला पथकातून काढण्यात आले होते.

Leave a Reply