पुन्हा एकदा प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार – राहुल गांधींशी फोनवर चर्चा

नवी दिल्ली : २५ मार्च – गेल्या वर्षी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. खुद्द प्रशांत किशोर आणि काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या विधानांमुळे त्यात अजूनच भर पडत होती. मात्र, ऐववेळी कुठेतरी माशी शिंकली आणि खात्रीशीर वाटणारा प्रवेश रद्द झाला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीचं नियोजन केलं आणि काँग्रेसनं प्रशांत किशोर यांच्याच एका सहकाऱ्यासोबत चर्चा सुरू केली. पण आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचं बोललं जात आहे. खुद्द प्रशांत किशोर यांनीच राहुल गांधींशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये निवडणुका
या वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये १८२ जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातची सत्ता देखील गेली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात चलबिचल सुरू झाली असून आगामी निवडणुकांसाठी पूर्ण तयारीनिशी उतरण्याची भूमिका नेतेमंडळींकडून मांडली जात आहे.
दरम्यान, गुजरातमधील निवडणुकांमध्ये भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातच आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: राहुल गांधींशी चर्चा करून गुजरात निवडणुकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, प्रशांत किशोर नेमके किती काळासाठी पक्षासोबत राहतील, याविषयी अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकांपुरतंच काँग्रेससाठी काम करणार असल्याचा प्रस्ताव राहुल गांधींशी बोलताना ठेवल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या वर्षी काँग्रेससोबत बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी पक्षावर टीका केली होती. “पक्षाचं अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार कुण्या एका व्यक्तीचा असू शकत नाही. विशेषत: गेल्या १० वर्षांत पक्षानं लढवलेल्या निवडणुकांपैकी ९० टक्के निवडणकांमध्ये पराभव पत्करावा लागला असताना”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती.

Leave a Reply