देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत अजून एक ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’

मुंबई : २५ मार्च – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना अजून एक ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ सरकारवर टाकला. याआधी फडणवीसांनी तब्बल १२५ तासांचं व्हिडीओ फूटेज असल्याचा दावा करत ते पेनड्राईव्ह तपास यंत्रणांकडे सोपवले होते. यापाठोपाठ गुरुवारी त्यांनी अजून एक पेनड्राईव्ह राज्याच्या गृहमंत्र्यांना देणार असल्याचं सांगत त्यामध्ये मुंबईचे सेवानिवृत्त एसीपी आणि एनकाऊंटर स्पेशालिस्ट इसाक बागवान यांच्याविषयीचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना पेनड्राईव्हमध्ये इसाक बागवान यांचे बंधू नसीर बागवान यांचं स्टिंग असल्याचं सांगितलं. मात्र, अजून आपण या पेनड्राईव्हचं फॉरेन्सिक ऑडिट केलेलं नसल्यामुळे तो सभागृहाच्या पटलावर न ठेवता फक्त गृहमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीसांनी इसाक बागवान यांचं बारामती कनेक्शन असल्याचं म्हटलं. “मुंबई पोलीस दलातले सेवानिवृत्त एसीपी एसाक बागवान एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचं बारामती कनेक्शन देखील आहे. हे सेवेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. बारामतीतली ४२ एकर एनए जमीन त्यांच्याकडे आहे. अजित पवारांचीही एवढी नसेल. मुंबईत देखील त्यांची मालमत्ता आहे”, असं फडणवीस म्हणाले.
इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम बागवान आणि चुलत भावजय बिल्किस बागवान यांच्यानावे नोकरीत असताना या जमिनी त्यांनी खरेदी केल्या. पण निवृत्तीनंतर त्यांनी फक्त साधा अर्ज देऊन या सगळ्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्या. बिल्किस बागवान, सोहेल बागवान यांनीही साधा अर्ज देऊन मालमत्ता हस्तांतरीत केली. इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या एका व्यक्तीला एक जमीन विकली आणि पुन्हा दोन महिन्यात तीच जमीन परत देखील विकत घेतली”, असा दावा फडणवीसांनी केला.
“या व्यवहारांमध्ये काही जमिनी फरीद मोहम्मद अली वेल्डरच्या नावाने घेतल्या होत्या. २०१७मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती, तेव्हा त्याने सांगितलं होतं की या वेल्डरला मी १० लाख रुपये दिले आहेत. त्याचा अकम्प्लीस म्हणून या वेल्डरचं नाव आलं आहे. त्याची चौकशी झाल्यानंतर ७ दिवसांत त्याचा मृत्यू झाला. ४१ लाख रुपयाला त्याने हीच मालमत्ता बागवान यांच्याकडून विकत घेतली होती. १० वर्ष नावावर ठेवली आणि नंतर ३०-१२-२०२१ ला वेल्डरच्या मुलाने ही संपत्ती पुन्हा इसाक बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली”, असं फडणवीस सभागृहात म्हणाले.
दरम्यान, वेल्डरसोबतच्या बागवान यांच्या व्यवहारांमध्ये मुंबईच्या एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याचं फडणवीस म्हणाले. “या सगळ्यामध्ये एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली. नसीर बागवानचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. त्यात तो मुंबईचा राजकीय नेता कसा बारामतीला गेला आणि मध्यस्थी केली हे सांगितलं. हाजी मस्ताननं तेव्हा व्यावसायिक आर के शाह याचं अपहरण केलं होतं. त्यानंतर इसाकने हाजी मस्तानसोबत मध्यस्थी करून त्या व्यावसायिकाला सोडलं होतं. त्याबदल्यात त्याला भावाच्या नावाने मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट मिळाला होता, असं सगळं बोलल्याचं त्या पेनड्राईव्हमध्ये आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply