दिशा सालियानची हत्याच, माझ्याकडे पुरावे देखील आहेत – नितेश राणे यांचा दावा

मुंबई : २५ मार्च – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूविषयीचं गूढ दिवसेंदिवस अधिकाधिक वाढू लागलं आहे. एकीकडे दिशा सालियानच्या पालकांनी बदनामी केली जात असल्याचा आरोप करत नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असताना दुसरीकडे आता भाजपा आमदार नितेश राणे या प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर विधानसभेत बोलताना नितेश राणेंनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. तसेच, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ आपल्याकडे पुरावे देखील आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी एक पेनड्राईव्ह सभागृहासमोर दाखवला आहे.
दिशा सालियानची हत्याच झाल्याचा दावा करताना नितेश राणेंनी विधानसभेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “दिशा सालियानची खरंच आत्महत्या असेल, तर तिच्या राहत्या इमारतीतलं सीसीटीव्ही फूटेज का गायब केलं गेलं? वॉचमनला का गायब केलं गेलं? तिथल्या विझिटर्स बुकमधली ८ आणि ९ तारखेचीच पानं गायब आहेत. तिचा होणारा नवरा रोहन राय देखील गायब आहे. तो कुणाच्याही संपर्कात नाही. तो साक्षीदार आहे त्या घटनेचा. मी जबाबदारीने सांगतो की ती आत्महत्या नसून हत्या आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, आपण दिशा सालियानच्या हत्येचे पुरावे मुद्दाम पोलिसांना दिले नसल्याचं नितेश राणे म्हणाले. “मला पुरावे पोलिसांना द्यायला जमले असते. पण मी मुद्दाम नाही दिले. कारण मुंबई पोलिसांच्या तपासावरच आम्हाला प्रश्न आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास दिशा सालियानला न्याय देण्यासाठी नसून कुणालातरी वाचवण्यासाठी केलेला आहे”, असं नितेश राणे म्हणाले.
“आता पेनड्राईव्हचा जमाना आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस युनिव्हर्सिटी ऑफ पेनड्राईव्हचे विद्यार्थी आहोत. आमच्या साहेबांनी दोन पेनड्राईव्ह दाखवले, तर आपल्या शिष्यानी एक पेन ड्राईव्ह तरी काढला पाहिजे. म्हणून एक पेनड्राईव्ह तयार करून आणला आहे. संवादाचा पेनड्राईव्ह आहे हा. या राज्याचा एक मंत्री दिशा सालियानच्या बलात्कार आणि हत्येमध्ये कसा सहभागी आहे, हे एक साक्षीदार मला आणि अमित साटम यांना सांगतोय. हे त्या पेनड्राईव्हमध्ये आहे. हे मी कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार आहे. कारण ज्याच्याबद्दल हा पेनड्राईव्ह आहे, तो मुलगा जिवंत तरी राहील का? याची शाश्वती नाही. पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही सिद्ध करू शकतो”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे. लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे पेनड्राईव्ह देणार”, असं म्हणत नितेश राणेंनी ट्विटरवर देखील पोस्ट केली आहे.

Leave a Reply