साहित्यिकाने सर्वप्रथम राष्ट्रीयत्व जपावे – डॉ. एस. एल. भैरप्पा

24 mar bhairappa11नागपूर : २४ मार्च – प्रत्येक साहित्यिकाने साहित्य निर्मिती करताना सर्वप्रथम आपण भारतीय आहोत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे, राष्ट्रीयत्व जपत साहित्य निर्माण करण्याचे काम लेखकांनी करावे असा हितोपदेश ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पदमश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी केला आहे.
एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता, अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यकर्त्यांनी त्यांची स्नेहभेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी भैरप्पा बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि भैरप्पांच्या कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी या उपस्थित होत्या.

24 mar bhairappaयावेळी उपस्थित साहित्यिक आणि साहित्य प्रेमींच्या प्रश्नांना उत्तरे देतांना भैरप्पा म्हणाले की आपण कोणत्या प्रांताचे, भाषेचे किंवा जाती धर्माचे आहोत याचा विचार करण्यापूर्वी सर्वप्रथम राष्ट्रीयत्वाची भावना जपायला हवी. आजही विमानाने परदेशी जातांना भारताच्या सीमा जेव्हा विमान ओलांडते तेव्हा काही क्षण मन गलबलून येते आणि परदेशातून परत येतांना विमान ज्यावेळी भारतीय सिमेंट प्रवेश करते, त्यावेळी मला पराकोटीचा आनंद होतो असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक लेखकाने लेखन करतांना मी जे काही लेखन करतो आहे, ते कशासाठी करतो आहे कुणासाठी करतो आहे, याचा विचार करून या लेखनाचे काय परिणाम होऊ शकतात यावरही विचार करावा. विचारपूर्वक केलेले साहित्य लेखनच खऱ्या अर्थाने चांगले साहित्य ठरते असे त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य निर्मिती करण्यासाठी आपण जगातील सर्व साहित्यिकांचे उत्तम साहित्य वाचले होते, असे सांगून सर्व भारतीय भाषांमधील साहित्यही साहित्यिकांनी अभ्यासायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण मराठी साहित्याचाही अभ्यास केला आहे, असे सांगून वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, यांच्या साहित्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आपले सर्व साहित्य भारतीय तत्वज्ञानावर आधारले असून त्यासाठी आपण रामायण महाभारतासह भारतीय तत्वज्ञानाचाही अभ्यास केला असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
आज आम्ही इंग्रजी शिक्षणाच्या मागे लागलो आहोत, जागतिक स्तरावर ते गरजेचेही आहे, मात्र एसएससी पर्यंतचे शालेय शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला हवे असे आग्रही प्रतिपादन भैरप्पांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केले. मातृभाषा ही अभिव्यक्तीची भाषा असल्याचे सांगून मातृभाषा आणि इंग्रजीमधील शब्द जर एकत्र शिकवले गेले तर इंग्रजी आणि मातृभाषा या दोन्हीही विकसित होऊन स्वतःचा विकास करता येईल, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी लिहिलेल्या साहित्यातील प्रसंग आणि इतर मुद्द्यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. भारतात सर्वदूर फिरून आपण तिथल्या चालीरितींचा अभ्यास केला आणि त्याचा उपयोग आपल्या साहित्यात कसा करून घेतला याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या त्यांच्या संबंधांबाबत माहिती देत एका राष्ट्रीय संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून भाषण केले असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. या चर्चेत उमा कुलकर्णीची विशेषत्वाने सहभागी झाल्या होत्या, त्यांनी अनेक प्रश्न कानडीत समजावून सांगत भैरप्पांना बोलते केले.
प्रारंभी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांतांतर्फे अविनाश पाठक, प्रकाश एदलाबादकर, डॉ. अमृता इंदूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन भैरप्पांचे स्वागत केले, सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत अविनाश पाठक, प्रकाश एदलाबादकर डॉ. राजेंद्र नाईकवाडे, आशुतोष अडोणी, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. प्रगती वाघमारे, सर्वेश फडणीस, प्रसाद कोफळी, प्रवीण योगी प्रभृती सहभागी झाले होते.

Leave a Reply