संपादकीय संवाद – अखेर देश कोरोनाच्या संकटातून मुक्त

येत्या ३१ मार्चपासून भारतात सध्या सुरु असलेले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवावे असे आदेश केंद्र सरकारने जारी केल्याचे वृत्त आहे. ही बातमी निश्चितच स्वागतार्ह आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण भारत देश या निर्बंधांमुळे जेरीस आला होता, आता भारतातील जनसामान्य निश्चितच सुटकेचा श्वास सोडतील.
जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. त्यामुळे शेवटी मार्च २०२० मध्ये पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश जरी केले. तेव्हापासून लावलेले निर्बंध आज कमी जास्त प्रमाणात सुरूच आहेत. यामुळे जनसामान्य निश्चितच त्रस्त झाले होते, मात्र सर्वांचाच नाईलाज होता. जर काळजी घेतली नसती, तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी किती वाढला असता आणि किती जणांना प्राण गमवावे लागले असते, याची कल्पनाही करवत नाही.
पंतप्रधानांनी समयोचित आवाहन केले त्याला देशातील नागरिकांनी तितकाच चांगला प्रतिसाद दिला,देशभरातील आरोग्य सेवक आणि समाजसेवकांनी देखील पूर्ण ताकदीनिशी कोरोनाच्या संकटाचा सामना केला, त्यामुळे मनुष्यहानी टळली आणि आज देश संकटाबाहेर निघालेला आहे.
कोणत्याही संकटाच्या वेळी एकत्र येऊन संकटाचा सामना करणे, ही भारताची परंपरा राहिलेली आहे. त्या परंपरेनुसारच भारतीयांनी या संकटाचा सामना केला. त्याबद्दल सर्व भारतीय अभिनंदनास पात्र आहेत, त्याचबरोबर ही परिस्थिती योग्य रीतीने हाताळल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारही अभिनंदनास पात्र आहेत, भविष्यात पुन्हा असे संकट न येवो यासाठीच आपण सर्व मिळून जगनियंत्याकडे प्रार्थना करूया.

अविनाश पाठक

Leave a Reply