वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

यवतमाळ : २४ मार्च – पाटणबोरी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठा (वारा )येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. आज सकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने शेतकरी शेतमजुर वर्गात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बहुतांश शेतामध्ये गहु चणा व उन्हाळा मुंग सोयाबीन पिक आहे. त्या पिकाची राखण करण्यासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना दिवसभर शेतात ये-जा करावी लागते. शिवाय रात्रभर रखवालदारी सुध्दा करावी लागते. मात्र आजच्या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेने संपुर्ण शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आता शेत पिकाचे रक्षण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कवठा येथील तीन शेतकरी आपल्या शेतात जात असताना अमरदीप धडसनवार यांच्या शेतातून वाघ आला व त्या वाघाने त्या तिघांवर हल्ला केला. अचानक वाघ आल्यावर तिघेजन एकमेकावर पडले. तिघेही वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघ जाण्याच्या मनस्थितीत नव्हता वाघाने हल्ला करणे चालूच ठेवले, तिघांनी आरडाओरड सुरू केली मात्र वाघाने वैभव वर हल्ला करून जखमी केले, त्याला सोडून प्रशांत ईरदंडे याच्यावर हल्ला केला. त्यालासुद्धा जखमी केले या तिघांच्या आरडाओरडन्याने बाजूचे शेतकऱ्याने तुतारीची काठी हातात घेऊन धावत आल्याने वाघाने पळ काढला. मात्र तोपयर्ंत वैभव गंगाधर भोयर वय २७ याला मांडी, पोटरी, हाताला व पाठीला वाघाने जखमी केले,तर प्रशांत इरदंडे वय ३१ याच्यावर सुद्धा हल्ला केला याला हातावर, छातीवर वाघाच्या पंजाने हल्ला केल्याने तो सुद्धा जखमी झाला. संकेत मिसार वय १८ याचा पाय लचकल्याने तो बाजूला पडून होता. आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांनी आरडाओरडा केल्याने सर्व शेतकरी जमा झाले. वनविभागाच्या कर्मचार्यांना फोन लावताच पूर्ण स्टाफ आला व त्या जखमीना पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केला व नंतर यवतमाळ येथे जिल्हा शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. या परिसरातील ही पहिलीच घटना नसून अनेक घटना झाल्या. या संदर्भात वनविभागाला अनेक तक्रारी सुद्धा दिल्या परंतु वन विभागाच्या दुर्लक्ष पणाने वाघाचे हल्ले होत आहेत. या पूर्वी सुद्धा गाई, बैल, गोरे, वासरू, अशी जनावरावर हल्ले झाली परंतु कवठा येथील माणसावर, वांजरी येथील गुराखी माणसांवर सुद्धा हल्ले झाले. संबंधित वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी व शेतकरी जनतेकडून होत आहे.

Leave a Reply