आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षातून हकालपट्टी होणार?

अमरावती : २४ मार्च – मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून निवडून आले. परंतु, ते सध्या पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. शिवाय आज स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या होणाऱ्या हिवरखेड येथील मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांना आमंत्रण नाही. अशावेळी देवेंद्र भुयार यांच्या स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. मौर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात राजू शेट्टी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यामधील मतभेद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आलेत. त्यानंतर देवेंद्र भुयार आमदार झाल्यापासून सक्रिय नसल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप आहे.
स्वाभिमानी विदर्भ समितीने देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव राजू शेट्टी यांच्याकडे देणार आहे. भुयार गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. भुयार यांनी बॅनरवरून राजू शेट्टी यांना हद्दपार केलंय. स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावत नाहीत. महाविकास आघाडीत मंत्रीपद राजू शेट्टी यांच्यामुळे मिळालं नाही, अशी भावना भुयार यांची आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज मेळावा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देवेंद्र भुयार हे निवडून आले होते. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती होती. मोर्शीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आली होती. या जागेवरून देवेंद्र भुयार निवडून आले. परंतु, मंत्री न मिळण्यामागे राजू शेट्टी जबाबदार आहेत, अशी भुयार यांनी भावना आहे. त्यामुळं ते स्वाभिमानी पक्षावर नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी जवळ केले आहे.

Leave a Reply