रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू

नागपूर : २२ मार्च – बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला उपचारार्थ नागपूरच्या रुग्णालयात हलविले असता तिथे मृत घोषित करण्यात आले. ही घटना आदिवासीबहूल भागातील पवनी ते हिवरा बाजार मार्गावरील खरपडा येथे सोमवार, दि. २१ मार्चला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. दुर्गाबाई नत्थुजी इनवाते वय अंदाजे (५२) रा. खरपडा असे मृतक महिलेचे नाव असून तिला मजूर पती व एक मुलगी आहे.
पवनी वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, सोमवारी नेहमीप्रमाणे दुर्गाबाई आपल्या बकऱ्या घेऊन गावाजवळच्या तलावाजवळ चरायला घेऊन गेली होती. यावेळी गावातीलच एक महिलासुद्धा बाजूलाच बकऱ्या चारत होती. येथे तलाव असल्याने बकऱ्यांच्या चाऱ्याची व पाण्याचीही व्यवस्था आहे. तलावाच्या पलीकडे लागूनच जंगल आहे. दरम्यान, यावेळी अचानक एका रानडुकराने दुर्गाबाईवर हल्ला केला. यात दुर्गाबाईच्या पाठीकडील भाग व हाताला गंभीर दुखापत झालेली होती. याचवेळी बाजूला असलेल्या बाईने रानडुकराला दुरूनच हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र, व्यर्थ ठरला. यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. पवनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून दुर्गाबाईला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, येथे तिला तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. दुर्गाबाईच्या वारसांना वनविभागाकडून १५ लक्ष रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे आरएफओ रितेश भोंगाडे यांनी सांगितले.

Leave a Reply