देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांचा उल्लेख जनाब केल्यामुळे मला तीव्र दु:ख – एकनाथ खडसे

मुंबई : २२ मार्च – एमआयएमनं महाविकास आघाडीमध्ये येण्याची ‘ऑफर’ दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांकडून देखील या ऑफरबाबत टीकात्मक सूर लावण्यात आला असला, तरी यासंदर्भात टीका करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीकडून देखील टीका करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांचा उल्लेख जनाब केल्यामुळे तीव्र दु:ख झाल्याचं खडसे म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांना जनाब म्हटलं. माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला आहे. मी त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसोबत गेलो आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्यातला जाज्वल्य अभिमान त्यांच्या लेखणीतून मी अनुभवलेला आहे”, असं खडसे म्हणाले.
मुंबईत बॉम्बस्फोट होत असताना बाळासाहेब ठाकरेंमुळेच हिंदू सुरक्षित राहिल्याचा दावा खडसेंनी यावेळी केला. “ज्या काळात महाराष्ट्रात हिंदुत्वाचा विचार उच्चारणं देखील भीतीदायक होतं, त्या काळात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रखर प्रचार केला. १९९३ला जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा मी आमदार होतो. तेव्हाची बाळासाहेबांची भूमिका अतुलनीय आहे. बाळासाहेब होते, म्हणून त्या काळात मुंबईतला हिंदू सुरक्षित राहिला. हे कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हादरलेला आणि घाबरलेला होता. रक्ताचे पाट वाहात होते. अशा काळात मदतीला कुणीही गेलं नव्हतं. तेव्हा बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक रस्त्यावर उतरलेले मी पाहिले”, असं खडसे यावेळी म्हणाले.
“राजकीय विचारांपोटी एखाद्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला असं म्हणणं मनाला वेदना देणारं आहे. मला या गोष्टीचं अतीव दु:ख झालंय”, असं देखील खडसे म्हणाले.

Leave a Reply