त्यांना मतदान करून कोणी विजयी केले हे मला माहीत नाही – जया बच्चन यांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : २२ मार्च – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आज पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलेंडर आणि रॉकेलच्या दरवाढीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांना मतदान करून कोणी विजयी केले हे मला माहीत नाही, जनतेने त्यांना आणले नसेल, असे जया बच्चन यांनी म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “हे सरकार असेच करते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांनी तुम्ही लोक सावध राहा, असे वारंवार सांगितले होते. निवडणुकीनंतर भाव वाढणार आहेत. त्यांना (भाजपा) कोणी सत्तेवर आणले माहीत नाही.” जया बच्चन यांनी यापूर्वीही भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मडियाहुन आणि मच्छलीशहर येथील सभेला संबोधित करताना योगी आणि मोदींनी त्यांच्या झोपडीत जावे, असे म्हटले होते.
त्यांना राजकारणाचे काय पडले आहे? १५ वर्षांपासून मी महिलांच्या संरक्षणात सहभागी आहे. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने केलेले दावे पोकळ आहेत. भाजपाचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजपा फक्त शहरे आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे काम करत आहे, असेही जया बच्चन यांनी म्हटले होते.
पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त एलपीजी सिलिंडरच्या किमतीही ५० रुपयांनी वाढल्या आहेत. १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ९४९.५० रुपये आहे. किमती वाढल्यानंतर विरोधकांना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आणि ‘अभिनंदन’ केले. पंतप्रधान मोदींनी प्रति एलपीजी सिलेंडर १,००० रुपये करण्याचे लक्ष्य गाठले आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही रोजची वाढ होणार असल्याचे खरगे म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, मोदी सरकारमध्ये जातीयवाद आणि द्वेष या एकमेव स्वस्त गोष्टी आहेत. बाकी सर्व महाग आहे.

Leave a Reply