अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे हि चूक, त्याची पुनरावृत्ती होणार नाही – संजय राऊत

नागपूर : २२ मार्च – ईडीने आरोप केले आणि चौकशी सुरु केली म्हणून घाईघाईत अनिल देशमुखांचा घेतलेला राजीनामा ही आमची चूकच होती, असे स्पष्ट करत आता कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही अश्या शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी आज ठणकावले.
शिवसेनेच्या शिवसंवाद अभियानानंतर्गत नागपूरला आले असता आज संजय राऊत यांनी पत्रकार क्लबमध्ये स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की अनिल देशमुखांवर गंभीर आरोप झाले असता आम्ही पूर्ण पुरावे न तपासताच राजीनामाच्या निर्णय घेतला गेला , हा राजीनामा घेण्यात घाई झाली, अशी कबुली देताना मोदी सरकार संपूर्ण देशात सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अनिल देशमुखांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत याकडे लक्ष वेधत केंद्रीय तपासयंत्रणांनी त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या, तर सीबीआयने २२ धाडी घाडल्या आणि ईडीने ५० च्या वर धाडी घातल्या, आयकर विभागाने ४० धाडी घातल्या. इतक्या धाडी घालून तुम्हाला कोणता विक्रम प्रस्थापित करायचा होता?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मोदी सरकारने केंद्रीय तपासयंत्रणांचा खुळखुळा करून टाकला आहे आणि हा खुळखुळा वाजवत ते विरोधकांना घाबरवू बघतात अशी टीका राऊत यांनी केली. कितीही सुडाचे राजकारण केले तरी महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर वाकला नाही आणि झुकणारही नाही असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवारांवर दबाव होता का असा प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी मला असं वाटत नाही असं उत्तर दिलं.
केंद्र सरकार आणि भाजप केंद्रीय तपासयंत्रणांचा उपयोग करून विरोधी पक्षांच्या सरकारांना नामोहरम करीत आहेत, असा आरोप करत तुमच्याकडे केंद्रीय तपासयंत्रणा आहेत तर आमचेही महाराष्ट्राचे पोलीस आहेत तेही कामाला लागले आहेत, भाजपने सर्व कॅबीनेट तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती, आता कोण तुरुंगात जाते ते लवकरच कळेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
संपूर्ण देशभरात भाजप सध्या सूडाचं राजकारण करत आहे. कारवाईची भीती ते दाखवत आहेत, ज्याचा मी देखील एक व्हिक्टीम आहे. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसावर आरोप ठेवण्यात आले, एक वर्ष झालं पण अद्याप त्यांना चौकशीत काय सापडलं? UPA च्या काळात फार कमी कारवाया होत होत्या, मात्र आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे. यामागचा हेतू काय आहे? या कारवायांमधून काय सापडलं? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे. आमची बदनामी करुन, भिती दाखवून तुम्ही शिवसेनेला ना वाकवू शकत ना आमच्या आघाडीचा केस वाकडा करु शकत असं म्हणत राऊतांनी भाजपला आव्हान दिलं आहे.युपीए च्या काळात ईडीच्या २३ धाडी झाल्या होत्या मोदी सरकारच्या ७ वर्षात २३ हजार धाडी पडल्या, त्यातील १९ प्रकरणांमध्ये तथ्य आढळले याकडे लक्ष वेधत केंद्रीय तपासयंत्रणा पक्ष कार्यकर्त्यांसारख्या वापरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विदर्भाच्या जनतेने बाळासाहेब आणि शिवसेनेवर प्रेम केले, खासदार निवडून दिले. पण आता आमदारांची संख्या कमी झाली ती आम्ही वाढवू. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसेनेची ताकद आम्ही वाढवणार आहोत. आम्हाल आमचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आणि पक्षाशी जोडणार आहोत, असं राऊत म्हणाले. यवतमाळ-वाशिमच्या लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यावेळी गैरहजर होत्या. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. हजर न राहण्याबाबत भावना गवळी यांनी रितसर परवानगी घेतली आहे. ईडीच्या छाप्यांमुळे भावना गवळी यांना कोर्टात हजर रहायचं होतं. भावना गवळींच्या मागे यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
खोटे आरोप आणि खोटे पुरावे विधानसभेत देणं त्याला आम्ही बॉम्ब मानत नाही, असं उत्तर राऊत यांनी भाजपच्या आरोपांना दिलं. मुस्लिमांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काही काळातील मुस्लिमांबद्दलची वक्तव्य पाहिली तर तुम्ही त्यांना ‘जनाब संघा’चे प्रमुख झाले असं होतं. मुस्लिमांसाठी संघाने राष्ट्रीय मंच स्थापन केला आहे, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्ला चढवला. सिनेमा काढून पीओके (पाकव्याप्त काश्मीर) परत येणार नाही. गेल्या सात वर्षात काश्मिरी पंडितांचे योग्य पुनर्वसन झाले नाही, अशी टीका संजय राऊत यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरून केली. पत्रपरिषदेला खा. कृपाल तुमाने, खा. राहुल शेवाळे, खा. राजन विचारे, आ. दुष्यन्त चतुर्वेदी प्रभृती उपस्थित होते.

Leave a Reply