संघ, भाजपचे हिंदूुत्व रोखण्यासाठी वामपंथी दलांनी लढा द्यावा – सीताराम येचुरी

नागपूर : २१ मार्च – केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात अराजकता निर्माण झाली असून संविधान अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात स्वयंघोषित गोरक्षक, दलित आणि मुस्लिमांवर हल्ले चढवत आहेत. न्यायव्यवस्था खिळखिळी केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार हिंदूत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. संघ, भाजपचे हिंदूुत्व रोखण्यासाठी वामपंथी दलांनी लढा द्यावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षा (मार्क्सवादी)च्या २३ व्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. येचुरी पुढे म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून हिंदूत्वाचा अजेंडा राबवला जात असून कामगार, महिला आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संघाची विचारसरणी देशात राबवली जात असून संविधान संपवण्याचे काम सुरू आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारला विरोध करणाऱ्यांवर ईडी व सीबीआयचा वापर करून कारवाया केल्या जात आहे. खासगीकरणाकडे देशाची वाटचाल सुरू असून राष्ट्रीय संपती विकली जात आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर देशद्रोही म्हणून कारवाई केली जाते. यामुळे लोकशाही संपुष्टात येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. भाजपचा हा चौमुखी चेहरा संविधानाच्या मूळ ढाच्याला धोके पोहोचवत आहे, अशी टीका येचुरी यांनी केली.
तीन महिन्यात रोजगार घटले आहे. उद्योगांत मंदी आहे. शेतीची बिकट अवस्था आहे. उत्पादन आधारित भाव मिळत नसल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून संविधानाच्या ढाच्याला जाणीवपूर्वक धोके पोहचवत आहेत. मार्क्सवादी संविधानाचा बचाव करत असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. दलितांवरील अत्याचार वाढले आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार बुलडोझर चालवत आहे. अल्पसंख्यकांवर हल्ले केले जात आहे. देशांतर्गत अशांतता निर्माण झाली आहे. सीमेवरील हल्ले वाढले आहेत. देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. देशाची सत्ता काही उद्योगपतींच्या हाती गेली आहे. राजकीय हस्तक्षेप आणि चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देश एका वेगळय़ा दिशेने चालला आहे. देशात काँग्रेस संपुष्टात येत असताना देश वाचवायचा असेल तर मोदींचा हिंदूत्वाचा अजेंडा संपवण्यासाठी सर्व वामपंथी दलांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे, असे येचुरी म्हणाले.

Leave a Reply