बिहारमध्ये विषारी दारू पिऊन २५ जणांचा मृत्यू

पटणा : २१ मार्च – देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी होत असताना बिहारमध्ये मात्र होळीने बेरंग केला आहे. राज्यात होळीच्या उत्सवादरम्यान विषारी दारु प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विषारी दारु प्यायल्याने बांका जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य मृत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. विषारी दारुमुळं काही जणांनी आपले प्राण गमावले आहेत. व अन्य गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर बांकाचे एसपी अरविंद कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यात अवैधरित्या विक्री केल्या जाणाऱ्या दारुमुळं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती आली नाहीये. अजून शवविच्छेदनाचे अहवाल हाती आलेले नाहीत. अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असं एसपी अरविंद कुमार यांनी म्हटलं आहे.
भागलपूर जिल्ह्यात साहेबगंजमध्येही विषारी दारुमुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सर्वांनी होळीच्या दिवशी विषारी दारुचे सेवन केले होते. मृत विनोद यादव यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, दारु प्यायल्यानंतर तिच्या पतीची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. भागलपुरमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. त्यातबरोबर, अनेक जण रुग्णालयात असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.
भागलपूर येथील नाथनगरमध्येही एशीच एक घटना घडली आहे. नाथनगरयेथील साहेबगंज मोहल्ल्या येथे काही जण दारुच्या बाटल्या घेऊन आले होते. दारु प्यायल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली व काळीवेळातच त्यांचा मृत्यू झाला. सर्व मृतक एकाच गावातील असल्याचे स्पष्ट झालं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सर्वांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं होतं. तसंच, विषारी दारुमुळं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. तर, स्थानिक पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, पोलीस याबाबत माहिती गोळा करत आहेत.

Leave a Reply