कविते ! करिन तुला मी ठार – प्रकाश एदलाबादकर

21 mar prakash

माझ्या कविहृदयी सन्मित्रांनो आणि सहृदयी कविमित्रांनो ,

आज जागतिक कविता दिन आहे. कविता या विषयावर लिहायला बसलो तर ,एक लेखमालाच होईल .मी स्वतः कवी नाही आणि तास दावाही मी कधी केला नाही परंतु कविहृदयाचा आणि कवितेचा आस्वादक नक्कीच आहे . यात काही कौतुक नाही कारण ,प्रत्येकच संवेदनशील व्यक्ती कविहृदयाची असते. असो आज तो विषय नाही . कवितादिनानिमित्ताने मला आज प्रकर्षाने आठवण आली ती ,प्रख्यात वैदर्भीय ,खरे तर नागपुरी ,कविश्रेष्ठ जयकृष्ण केशव उपाध्ये यांची ! इ .स. १८८३ ते इ.स. १९३७ हा त्यांच्या हयातीचा काळ . त्यांना अर्वाचीन विदर्भातील कविकुलगुरू म्हणत. त्यांनी लिहिलेले ‘लोकमान्य चरित्रामृत ‘, पोपटपंची ‘, ‘चालचलाऊ भगवदगीता ‘ यांनी एके काळी प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली होती .विडंबन काव्याचे ते आद्य प्रवर्तक आहेत . ‘विसरशील खास मला दृष्टिआड होता .’ हे गीतही बुवा उपाध्ये यांचेच ! असो आज उपाध्ये बुवांचे कार्यकर्तृत्व हा विषय नाही . परंतु बुवांनी १९२७ साली लिहिलेल्या दोन कविता आजच्या कविता दिनाच्या निमित्ताने मुद्दाम जशाच्या तश्या प्रेषित करतोय . साठोत्तरी ,नव्वदोत्तरी , आधुनिकोत्तर इ.इ. कविंनी या कविता अवश्य वाचाव्या . आजच्या समकालीन कवितेचे भविष्य उपाध्ये बुवांनी ९५ वर्षांपूर्वीच तर वर्तविले नव्हते ना ? असे असेल तर ,ते खरे द्रष्टे कवी होते, असेच म्हणावे लागेल.मित्रांनो या दोन्ही कविता चांगल्या ऐसपैस आहेत . पण अवश्य वाचा…..

कविते! करिन तुला मी ठार

कविते! करिन तुला मी ठार ।।ध्रु .||
पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविलें फार
रस बिस आतां मम साम्राज्यी कांहिं न तुज मिळणार

अलंकार मद-मत्त जहालिस धुंदि उतरतों पार
मोडुनि तोडुनि फेकुनि त्यांना दृष्टि न दिसुं देणार

पदोपदीं अवसानीं तुझिया करुनी घातक वार
सुवृत्त अथवा सुपदा कशि तुं हेंचि आतां बघणार

पदलालित्यें जना भुलविलें केले नाना चार
भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार

नादांतचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार
नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार

समृद्ध अर्थें असा मिरविला आजवरी बडिवार
अर्थाचा परि लेश यापुढें तुजला नच मिळणार

कोशावरि तव भार सर्व परि लाविन त्यांचे दार
शब्दांच्याचि न कृतिच्या दैन्ये मळविन तव संसार

व्याकरणाच्या अंकी बसुनी शुद्ध म्हणविशी फार
ठार करुनि परी तया तुझ्यावर ओतिन अशुद्ध धार

अपशब्दांचा असा तुझ्यावर करितों बघ भडीमार
जरी न मेलिस तरि मेल्यापरि होशिल मग बेजार

देश धर्म वा वीर विभूती तुज न अतां दिसणार
आता वणवण घुबडासंगे करविन तव संचार

मजलागीं तूं कोण समजशी मी तों कवि कालदार

कालदारचि कां शाहीरांचा फर्स्टक्लास सरदार

शाहीर

या महाराष्ट्र देशात ।उपजलो मीच शाहीर ।। ध्रु .||

राष्ट्रात नाद घुमविला । जवळचि अतां उद्धार
यापुढती काव्यश्रीला |चढवीन नवा शृंगार
शब्दसंघ फुलविन हर्षें ।स्वातंत्र्य तया मिळणार
हलवीन सर्व इतिहास
कांपवीन व्याकरणास
विश्रांति न संगीतास
मेलेले मुडदे म्हणती ।उपजलों मीच शाहीर

शाहिरा कशाला विद्या ।मळतसे काव्य विद्येने
जसजसें वाढतें ज्ञान ।तसतसे काव्य विलयाने
शाहिरें न म्हणुनि शिकावे ।असावे मस्त अज्ञानें
अज्ञानवारूवरि स्वार
गर्वाची करिं तलवार
होऊनिया बेदरकार
सर्वत्र गात सुटेन । उपजलो मीच शाहीर

कवि सर्व इतर ते कवड्या ।मी एकमात्र कलदार
कविता त्या म्यांच कराव्या ।फिरवाव्या दारोदार
पडद्यातिल कविता कसली । पाहिनाच जी बाजार
निर्लज्ज बनूनि फिरावे
दिसताच जमाव शिरावे
अपुलेंच काव्य भरडावे
करू शके कोण मजविण हें ।उपजलों मीच शाहीर

शाहिरें आपुलें काव्य ।म्हण म्हणता कधिं न म्हणावे
प्रेमें कुणी आग्रह करितां ।त्यांच्यावरि वसकन जावें
आपल्याच मग इच्छेनें ।भलतेंसें गात सुटावे
मग किटोत कान कुणाचे
काय होय आपणां त्याचे
हे वैभव शाहिरतेचे
हे वर्म जायला पटले ।तो तोच होय शाहीर

रागांची पर्वा कोणा ।तालाची वा दरकार
राग ताल दुसऱ्यासाठी ।मी न त्यांत सांपडणार
मी स्वयंभु शंभु वाटोळा ।मी असे स्वैर शाहीर
मज हसतो रसिक नव्हे तो
कवितेंत तालसुर बघतो
अर्थ वा पाहण्या धजतो
काव्यात अर्थ जो ठेवी । तो हाय कुठुनि शाहीर

कोणतेंहि मासिक उघडा ।मम दिसे त्यात कवि-कर्म
मम अखंड काव्यस्राव ।नच केवळ मासिक -धर्म
संपादकांस मज अथवा ।हें ठावें सगळें मर्म
शाहिरपण माझे उघडे
हाडांची करुनी काडें
बाडांवरि लिहिलीं बाडे
यावरिहि कोण मजलागीं ।म्हणणार नाहिं शाहीर ?

आंतरराष्ट्रीय कविता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

-प्रकाश एदलाबादकर

Leave a Reply