महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार मी आणणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १७ मार्च – गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
गोव्याच्या निकालानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत असल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढण्यात येत आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचं म्हटलं. तसंच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे असंही म्हणाले.
महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे,” असं फडणवीस म्हणाले.
राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार,” असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो असं सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल असंही ते म्हणाले.

Leave a Reply