न्यायालयाच्या अवमान प्रकरणात कारागृह अधीक्षकांना सात दिवसांचा कारावास व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा

नागपूर : १७ मार्च – नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरविण्यात आले असून सात दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी हनुमान पेंदाम याने नागपूर खंडपीठामध्ये तातडीने पॅरोल मिळावी म्हणून याचिका दाखल केली. न्यायालयाने कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला खुनाच्या आरोपात शिक्षा सुनावण्यात आली असून त्याने आठ वर्षे कारावास भोगला आहे. एकदा त्याला मिळालेली संचित रजा संपवून त्याने सर्मपण केले. मात्र, त्याच्याकडे कोविड-१९ निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्याचे सांगत त्याचे सर्मपण कारागृहाकडून नाकारण्यात आले. पुढे त्याला अटक करण्यात आली. अनेकदा त्याचे पॅरोल अर्ज फेटाळण्यात आले. कुमरे यांनी न्यायालयापुढे अनेकदा सादर केलेल्या माहितीमध्ये तफावतसुद्धा आढळली होती. तसेच न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करण्याची कुमरेंची ही पहिली वेळ नसल्याचे मत नोंदवीत न्यायालयाने त्यांना अवमान नोटीससुद्धा बजावली होती. याप्रकरणी बुधवारी न्या. व्ही. एम. देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू लक्षात घेता अनुपकुमार कुमरे यांना दोषी ठरवित सात दिवसांची शिक्षा, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा ठोठावली. न्यायालय मित्र म्हणून अँड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, न्यायायालने अनुप कुमरे यांना या शिक्षेच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १0 आठवड्यांची मुदत दिली आहे. तोपयर्ंत शिक्षेच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली असून, या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

Leave a Reply