दिवसाढवळ्या गुंडाची चाकूने गळा चिरून हत्या

नागपूर : १६ मार्च – नागपूर शहरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी डिप्टी सिग्नल, गोपालनगर येथे दिवसाढवळ्या एका गुंडाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. कळमना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृतकाचे नाव विक्रांत ऊर्फ भुऱ्या हरिभाऊ बंडगर (२४) असे असून आरोपीचे नाव गणेश शालिकराव बेडेवार (३५) रा. आदिवासी प्रकाशनगर असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत आधी प्रकाशनगर येथे राहत होता. सध्या त्याचा कोणताही स्थायी पत्ता नव्हता. तो कोठेही काम करायचा आणि तेथेच राहायचा. विक्रांत गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते. मागील तीन वर्षांपासून मात्र त्याच्याविरोधात कोणताही रेकॉर्ड नव्हता. विक्रांत आधी या भागात राहत असल्याने आरोपी गणेश त्याला ओळखत होता.
मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गणेश विक्रांत याला डिप्टी सिग्नल, गोपालनगर येथे घेऊन गेला. येथे काही कारणांवरून या दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. याचदरम्यान गणेशने चाकूने वार केले. विक्रांत तेथून कसाबसा पळालया लागला. गणेश त्याचा पाठलाग करीत होता. त्याने विक्रांतला दगड फेकून मारला. दगड डोक्यावर लागल्याने विक्रांत बेशुद्ध होऊन पडला.
यानंतर गणेशने त्याच्यावर पुन्हा चाकूने वार केले. त्याचा गळा चिरला. यात घटनास्थळीच विक्रांतचा मृत्यू झाला. विक्रांतची बहीण हैदराबादला राहते. पोलिसांनी तिला याबाबत माहिती दिली आहे. तर पोलिसांनी गणेशला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. गणेश टायरच्या दुकानात काम करीत होता.

Leave a Reply