डॉ. सतीश पावडे यांच्या दोन नाट्यसमीक्षा ग्रथांचा लोकार्पण समारंभ २७ मार्च रोजी

नागपूर : १६ मार्च : जागतिक रंगभूमी दिनाच्यानिमित्ताने प्रसिद्ध नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यसमीक्षक तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश यांच्या “मराठी रंगभूमी : चर्चा आणि चिंतन” तसेच “मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” या दोन नाट्यसमीक्षा ग्रथांचा लोकार्पण समारंभ २७ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३०वा. स्थानीक लोक महाविद्यालयात आयोजीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच ९९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख(पुणे) यांच्या हस्ते, अ.भा. हिंदी सेवा संस्थान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वनराई फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी (नागपुर) यांच्या अध्यक्षतेखाली हा पुस्तक लोकार्पण समारंभ होईल. प्रसिद्ध समीक्षक प्रा. अविनाश कोल्हे (मुंबई) तसेच कवयित्री, समीक्षक, लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर(चंद्रपूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. वर्धा जिल्ह्याच्या विदर्भ सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख , जेष्ठ कवी, समीक्षक डॉ. राजेंंद्र मुंढे, लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता प्रा. प्रसेनजित तेलंग (चांदूर रेल्वे) यां ग्रथांवर अभ्यासपूर्ण भाष्य करतील.
यशवंतराव दाते स्मृती संस्था, संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद, मराठी कवी-लेखक संघटना, किरण बहुद्देशीय सेवा संस्था आणि युवा कला सांस्कृतिक संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा लोकार्पण समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. या समारंभास साहित्य आणि नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समारंभ संयोजक प्रदीप दाते, रंजना दाते, कविवर्य संजय इंगळे तिगांवकर, डॉ. रत्ना चौधरी-नगरे, नंदकुमार वानखेडे, ज्योती भगत, पल्लवी पुरोहित, राजु बावने, आयुषी चांदेकर, अश्विनी रोकडे, विष्णु कुमार आदिंनी केले आहे.

Leave a Reply