मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

धन्यवाद…. संगायचच राहून गेलं

” जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधूनी पाहे” आपल्या आयुष्यात खर तर पूर्णपणे सुखी असा कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही व्याधी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. आज आपण जिथे आहोत तिथून तुम्ही बाहेर झाकून पहा, आपल्यापेक्षा कितीतरी लोक कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. तेव्हा वाटतं की, जे मिळालं ते किती चांगल मिळाल . तुम्ही आपल्या अंतर्मनात झाकून बघा, आतापर्यंत घडणाऱ्या प्रवासाला आठवा तुमचे आयुष्य खूप सुखात गेल. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, त्यावेळी आपण त्यांची किंमत केलेली नसेल. ती व्यक्ती गेल्यावर, माणसाला त्या व्यक्तीची किंमत कळते. असं का बरं होतं असाव, हा विचार तुम्ही कधी केला का? नाही ना. कारण आपण ती व्यक्ती किती चांगली होती. आपण फक्त त्या व्यक्तीत किती चुका होत्या यातच आपण आपला वेळ खर्च केला. पण त्या व्यक्तीची कमी तुम्हाला कधी ना कधी जाणवतेच. हा जगाचा नियम आहे. म्हणून जेव्हा जशी जशी वेळ येईल त्या त्या व्यक्तीचे तुम्ही आभार माना त्याची किंमत करा तुमच्या मनात जे आहे ते बोलून मोकळे व्हा. नंतर मग असं नको व्हायला, मला हे सांगायचं राहून गेल. त्यांना धन्यवाद द्यायला विसरू नका. आज तुम्ही जे काही आहात ते त्यांच्यामुळे आहात हे सांगायला विसरू नका.
आपल्याला देवाने जे शरीर दिले आहे, आपल्या आयुष्यात ह्या शरीर रुपी गाडीचा प्रवास चालू आहे. त्या शरीराच्या गाडीचे आभार माना. त्यांना सांगा, ‘तुम्ही आहे म्हणून मी आहे’ हे शरीर जोपर्यंत स्वस्थ आहे तोपर्यंत ते व्यवस्थित चालू आहे. ते स्वस्थ नसेल तर ही शरीराच्या गाडीची गती कमी होईल.ह्याची साथ असेल तर सर्व काही तुम्ही करू शकता. म्हणुनच म्हणतात ना health is wealth.
आज तुमच्या आयुष्यात अनेक लोकांनी तुमच्या मार्गात प्रवास केला. होणाऱ्या घटनांना त्यांनी तुम्हाला वेळप्रसंगी साथ दिली. त्यांना विसरू नका. कारण त्यांना सांगायचं राहून गेलं की तुम्ही आयुष्यात किती मोलाचे आहात.
येणाऱ्या आयुष्यात किंवा चालू घडामोडीत आज ज्या लोकांची तुम्हाला साथ आहे त्यांना तुम्ही रोज धन्यवाद द्या. कारण तुमच्या आयुष्यात ती आली, त्यांना किंमत द्या, त्यांना दुखवू नका, स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघा.
आपल्या दैनंदिन रोजच्या जगण्यातले उदाहरण बघा प्रत्येकाचे महत्व वेगवेगळे असते अगदी जवळची नाती पती-पत्नी, मुलं,आई बाबा, बहीण भाऊ, वहिनी, काका-काकू या सर्वांचे महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. एखाद्या व्यक्ती बद्दल मनात असं आणू नका की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तरी चालेल. कोणास ठाऊक, आयुष्यात असा प्रसंग येईल की त्या व्यक्तीची त्या प्रसंगी तुम्हाला गरज भासेल. म्हणून जे काही मिळालं आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा.
आजच्या पिढीला आपले आई-वडील हे किती अडाणी आहेत. त्यांचे विचार किती बुरसटलेले आहेत असं वाटतं. पण आपण लहान असताना त्यांनी आपल्यासाठी किती हाल-अपेष्टा सहन केल्या. स्वतःच्या तोंडाचा घास काढून आपल्याला भरवलं या सगळ्या गोष्टी आपण वेळेनुसार विसरत चाललो आणि ज्या काही चुका आहे ते मनात ठेवून सतत दोष देत राहिलो हे बरोबर आहे का याचा विचार तुम्ही करावा.
नशिबाने जे मिळाले आहे त्याचा आदर करा त्यांना मनापासून धन्यवाद द्या उद्या असे नको व्हायला अरे, हे तुम्हाला सांगायचे राहून गेले. म्हणून वेळोवेळी धन्यवाद देत चला. हा मंत्र सतत करत राहिला तर दुःखाची झळ तुम्हाला कधीच स्पर्श करणार नाही हे विदितच आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply