भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही – मोदींचे स्वपक्षीयांना खडे बोल

नवी दिल्ली : १५ मार्च – उत्तर प्रदेशसहित चार राज्यांमधील निवडणुका जिंकल्यामुळे भाजपा नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर सडेतोड भाष्य केलं. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपा खासदारांच्या मुलांना तिकीट न देण्याचे मीच सांगितले होते, असे म्हणत मोदींनी भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, असे पुन्हा एकदा पक्षातील नेतेमंडळींना सांगितले. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आदी बडे नेते उपस्थित होते.
या बैठकीबाबतचे सविस्तर आहे. “या निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांना तिकीट मिळालेले नाही, त्यासाठी मीच जबाबदार आहे. पक्षात घारणेशाहीला स्थान दिले जाणार नाही. अनेक खासदारांच्या मुलांना मी सांगितल्यामुळे विधानसाभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालेले नाही. आपण घराणेशाहीच्या विरोधात आहोत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या बैठकीत त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’वरदेखील भाष्य केले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला भाजपाकडून तिकीट मिळाले नव्हते. रिटा जोशी यांनी मुलाला संधी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मुलाला तिकीट मिळाले, तर मी माझी खासदारकी सोडायला तयार आहे, असंदेखील रिटा जोशी म्हणाल्या होत्या. मात्र एवढे सारे प्रयत्न करुनही रिटा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांना उत्तर प्रदेशमध्ये भाजपाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. उत्तराखंडमध्येही अगोदर भाजपामध्ये असलेले हरक सिंह रावत यांनी आपल्या सूनेसाठी तिकीट मागितले होते. मात्र त्यांनादेखील तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर हरक रावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तिकिटाचे वाटप करताना भाजपाने घराणेशाहीचा मुद्दा समोर ठेवला होता. पक्षामध्ये घारणेशाही सुरु होऊ नये म्हणून त्यांनी अनेकांना तिकीट न देण्याचे सांगितले होते. मोदींनीच हो स्पष्ट केल्यामुळे आता चार राज्यांत निवडणुका जिंकण्यासाठी हा मुद्दा भाजपासाठी जमेची बाजू ठरला असावा, असा अंदाज बांधला जातोय.

Leave a Reply