बकुळीची फुलं : भाग २१ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

प्रत्येकाच्या आयुष्यात खुप माणसं येतात . काही सर्वसामान्य असूनही असामान्य होतात त्या लहानश्या मदतीने . त्या माणसाने केलेली मदत हे एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतं
जेव्हा जेव्हा मी माझ्या आयुष्यात मागे वळून पहाते तेव्हा लक्षात किती माणसं माझ्यासाठी मदतीचा हात घेऊन उभी होती . माझ्या हातून अनेक चुकाही झाल्या .
माझी घाई ,गडबड , गोंधळ हे नेहमीच मला भेटलेले जीवाभावाचे मित्र होते. चौथीत असताना माझ्या नंतरच्या भावाला आजी नागपूरला घेऊन गेली होती. त्यामुळे मी आणि तो दोघंच घरी राहात होतो दुपारी.
आई शाळेत जातांना माझ्या दुस-या नंबरच्या भावाला घरी ठेवून जायची. तो काही लहान नव्हता होता चार वर्षांचा . आई त्याच्यासाठी, माझ्यासाठी दोन डब्यात वेगवेगळे खाऊचे डबे ठेवून जायची .
मी खरंच खादाड होते . मी माझा डबा तर खातच होते आणि भावाचा अर्धा डबा खात होते.
त्याला दुपारी झोप यायची तो झोपला रे झोपला की माझं खाणं सुरू व्हायचं . आई मधल्या सुट्टीत यायची .
ती विचारायची
“डबा खाल्ला , दिलास ना त्यालाही की विसरलीस ?” मी चक्क खोटं सांगायची “भाजी पोळी खातांनाच त्याला झोप येते. बघ अर्धा डबा उरलाय . “
त्यादिवशी ती तशीच आली होती . तिने त्याचा डबा पाहिला .
” आज सारं खाल्लं वाटतं . आज माझा शेवटचा तास नाही. मी लवकर येईन . “
ती गेली तसं मलाच कसंतरीच वाटलं . त्याचाही डबा मीच खाल्ला होता . आता तो उठला तर? रडला तर ? त्याला भूक लागली तर ?
शेजारून काही आणायचं मागून ? त्यांना काय सांगायचं ? आणि त्यांनी आईला सांगितलं तर ?
प्रश्नच प्रश्न होते . आई जातांना स्वयंपाक घराला कुलूप लावून जायची . एकतर मांजर येऊन दुध प्यायची , कधी मागचं दार उघडं असलं की, कुत्राही आत यायचा . म्हणून दोन भरपूर डबे भरून ड्रावरमधे ठेऊन जायची . कळशी भरून ठेवायची . दोन छोटे ग्लास त्यांच्या माझ्या आवडीचे ठेवायची. सारी सोय करूनच जायची , तसं घरात कामवाली बाई पण नव्हती. एकटीच ती सारं करायची .
दादा कधी नागपूरला तर कधी सकाळी लोकलने ऑफीसला जायचे . माझी सकाळची शाळा माझीही तयारी असायची, डबा असायचा.
आता मी आणि माझा दुस-या नंबरचा भाऊ होतो . तो सावळा मी ही सावळी . आई म्हणायची
“रंगरूप , उंची आपल्या हातात नसते पण
परिश्रम , अभ्यास, सहानुभूती आपल्याला वाढवता येते . मनुष्य चांगल्या विचारांचा असेल तर तेच तेज त्यांच्या मुखावर असतं” आई शिक्षिका असल्याने क्षणाक्षणाला भरगच्च वाक्यं मला सांगायची .
आज तीच वाक्यं मी वापरतेय . मला साधी वाक्यं अळणी वाटावीत अशी तिची वाक्यं असायची . त्यातून समजावी , उपदेश असायचा .
माझ्या चार वर्षांच्या भावाला सांभाळणं कठीण नव्हतं . त्यातून ती मधल्या सुट्टीत यायची .
आज माझ्या भावाने डोळ्यातलं सारं खाल्लं म्हणून ती प्रसन्न मनाने शाळेत गेली .
ती गेली आणि भाऊ उठला. भूक लागली होती . मी त्याला पाणी दिलं . त्याने ते भांडं फेकून दिलं आणि ड्राव्हर जवळ जाऊन तो ओढू लागला . मी त्याला काय देता येईल याचा विचारच करत होते .
त्यांच्या जोर लावून ड्राव्हर ओढण्यामुळे तो खस्सकन बाहेर आला . आणि खाली पडला . त्यात दोन तीन लहान औषधांच्या बाटल्या होत्या .
त्यातली एक उघडली आणि एक गोळी त्याला दिली . तेवढ्यात लिमलेटच्या गोळ्या असलेला डबा दिसला . आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तीन लिमलेटच्या गोळ्या कडकड करत खाल्ल्या आणि दोन गोळ्यांचे अंगणातल्या दगडानी तुकडे करून त्याला दिले . त्यांच्या घशात अडकू नये म्हणून मी काळजी घेतली .
काहीच वेळात तो खाली बसला आणि काहीच वेळात तो जमिनीवर झोपला . मी त्याला सरकवत चटई पर्यंत नेलं आणि त्याला त्यावर झोपवलं .
साडे चार वाजता आई आली .तिने त्याला झोपलेलं पाहिल्यावर तिने प्रथम त्याला ताप आलाय का पाहिलं. ताप नव्हता . मग तिने प्रश्नावर प्रश्न विचारून माझ्याकडून खरी माहिती काढून घेतली .
ती तात्काळ त्याला घेऊन शेजारच्या
डॉक्टरांकडे गेली .तिला आलेली शंका तिने डाक्टरांना सांगितली असावी . मी दार बंद करून डाक्टरांच्या दाराबाहेर उभी राहिले .
“चुकून त्याने झोपेची गोळी खाल्ली आहे , हे बरोबर आहे. ” डॉक्टर म्हणालेले मी ऐकलं . आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला . ती बाटली आईने अगदी ड्रायव्हरच्या अगदी मागच्या बाजूला मला सांगून ठेवली होती . ती तिच्या मैत्रिणीला हवी होती . आणि ती मलाच तिला द्यायला शाळेत जातांना देणार होती. खरं तर ती बाटली सिलबंद होती.
भावाच्या रडण्यात मी विसरले . आणि जोर लावून मीच ती बाटली उघडून त्यातली गोळी भावाला दिली होती. आत्ता डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला जाणीव झाली .
डॉक्टर आईला म्हणाले .
तुम्ही घरी जा हवंतर . मी त्याला इथेच ठेवतो . शुद्धीवर येईपर्यंत. पण आईचं ती , ती कशी येणार ?
मला वाटलं घरी आल्यावर आई खुप लागतील , मला मारील , कान ओढील . पण तसं काही झालं नाही . दुस-या ची चुक स्वतःवर घ्यायची तिला सवयच होती .
मी रडत रडतच आईला म्हणाले
“मी त्याच्याही डब्यातलं सारं खाल्लं . आणि त्याला ती कसलीतरी गोळी दिली , तो खुप रडत होता म्हणून .”
“तुझी चुक नाही . आज मी ती बाटली दुसरी कडे ठेवायला हवी होती . आणि तुला भूक लागते तेव्हा उद्यापासून आणखी ठेवीन डब्यात . रडू नकोस. बघ तुझा भाऊ कसा आनंदात आहे . खेळ त्याच्याशी.”
आज वाटतं ती कशी आई होती एवढ्या मोठ्या चुकीवर सहज पांघरूण घालून , मला जवळ घेत ती म्हणाली होती .
“जीवनात अनेक घटना घडत असतात . आणि ज्यांच्या त्याला कळत असतात अशावेळी “आपण चुकलो ” असं म्हटलं ना की , मनाचं आकाश निरभ्र होतं. आणि मन स्वच्छ असणं सर्वात महत्वाचं”
तेव्हा यातलं मला काहीही कळलं नव्हतं पण आता कळतंय .
क्षमा मागायला ही मोठं मन लागतं लागतं आणि क्षमा करायलाही मोठं मन लागतं ..आज हे मला कळलं आहे हे सांगायला आई ह्या जगातच नाही…..

शुभांगी भडभडे

Leave a Reply