दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची भावाच्या मदतीने आईनेच केली हत्या

नागपूर : १५ मार्च – लहान मुलगा अगदी दारूच्या व्यसनाच्या आधिन झाल्यामुळे दारू पिल्यानंतर घरी आल्यावर भांडण करीत होता. तो सुधरावा याकरिता त्याला कुटुंबीयांनी महाल येथे एक व्यवसाय सुरू करून दिला. परंतु, त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. त्याच्या त्रासाला वैतागून मोठय़ा मुलासह आईने त्याची हत्या केली. शुभम अशोक नानोटे (वय २२) असे मृतकाचे नाव आहे. तर, नरेंद्र अशोक नानोटे (वय २७) आणि रंजना अशोक नानोटे (वय ४७) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नंदनवन पोलिस ठाणे हद्दीतील नंदनवन झोपडपट्टी येथे ही घटना घडली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नाटोटे परिवार हा नंदनवन झोपडपट्टीत गल्ली नंबर २ मध्ये वास्तव्याला आहेत. शुभम महालातील बाजारात इमिटेशन ज्वेलरी विक्रीची कामे करीत होता. तर आई कॅटर्सच्या कामाला आहेत. शिवाय, मोठा भाऊ नरेंद्र हा इलेक्ट्रिशियनचे काम करतो. मृतक शुभमचा महिन्याभरापूर्वीच २३ फेब्रुवारी रोजी निकिता या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर शुभम हा नंदनवनमधील घर सोडून पत्नीसोबत खरबी येथे राहायला गेला. दरम्यान, शुभम याला दारूचे व्यसन जडले होते. रविवारी तो त्याच्या खरबी येथील घरी न जाता आईच्या घरी आला आला. घरी आल्यावर तो आईला ५ हजार रुपये मागत होता. परंतु, आईने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर शुभमने शिवीगाळ करत घरातील सामानाची फे काफेक सुरू केली. आईने मोठा मुलगा नरेंद्र याला बोलावून घेतले. नरेंद्र घरी आला आणि त्यानेही शुभमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी शुभम नरेंद्रच्या अंगावर धावून आल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. अशातच, नरेंद्रची आई लगेच नंदनवन पोलिस ठाण्यात गेली आणि शुभमविरोधात तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना समज दिल्यानंतर शुभम शांत झाला. दोन्ही भावांच्या हाणामारीत शुभम जखमी झाला होता. त्यामुळे नरेंद्र आणि त्याच्या आईने शुभमला दवाखान्यात आणले. उपचारानंतर त्याला घरी आणले. जेवण केल्यानंतर तो झोपला. परंतु, सोमवारी सकाळी तो उठलाच नाही. शुभमचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आईने पोलिसांना याबाबत माहिती दिली. उत्तरीय तपासणीत शुभमचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मृतकाचा भाऊ नरेंद्र आणि आई रंजना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply