मेमरीतला डेटा – अविनाश पाठक

सरसंघचालकांनी केले माझ्या लेकीचे कौतुक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकपद ही तसा विचार करता फार मोठी जबाबदारी आहे. आज देशातील सुमारे 40 ते 45 कोटी नागरिक संघपरिवाराशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या जुळलेले आहेत. आज संघाशी संलग्न असलेल्या देशभरात 100 हून अधिक राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटना आहेत. या सर्वांचे पालकत्व सहाजिकच सरसंघचालकाकडेच येते. हे सर्व सांभाळत असताना संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीबद्दल माहिती ठेवणे आणि काही कळल्यास लगेच त्याच्या सुखदुःखात सहभागी होणे हा तसा लक्षणीय गुणच मानावा लागेल. या गुणाचा अनुभव डॉ. भागवतांच्या संपर्कात येणार्या अनेकांना वेळोवेळी आला आहे.
डॉ. मोहन भागवत म्हटले की माझ्या आठवणी 1971 या वर्षाच्या मे महिन्यात पोहचता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशिक्षा वर्गात त्यावर्षी मी प्रथम वर्षाचा प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झालो होतो. संघात सुमारे 30 ते 40 प्रशिक्षणार्थींच्या गटाला ङ्गगणफ असे संबोधले जाते तर 3 ते 4 गण एकत्र करुन एक वाहिनी बनविली जाते. प्रत्येक गणांवर एक शिक्षक असतो तर प्रत्येक वाहिनीचा एक वाहिनीप्रमुख असतो. पशुवैद्यकीयची परीक्षा पास करून संघकार्यात पूर्ण वेळ उतरण्याच्या विचारात असलेले डॉ. मोहन भागवत हे त्यावेळी आमच्या प्रथम वर्षाच्या वाहिनीचे वाहिनीप्रमुख होते. त्यावेळी ते आम्हाला खड्ग म्हणजेच तलवार चालवायला शिकवायचे. त्यांच्या आणि माझ्या वयात फारसे अंतर नसल्यामुळे त्याचवेळी त्यांचा माझा बर्यापैकी स्नेह जमला होता. नंतरच्या काळात कधीमधी त्यांच्या भेटी झाल्या मात्र 1988 नंतर 2000 पर्यंत आमची भेट नव्हती. 2000 साली ते संघाचे सरकार्यवाह झाले तेव्हा पत्रकार म्हणून मी त्यांना भेटलो. त्यावेळी तब्बल 12 वर्षानंतर भेटलो असतानाही त्यांनी पटकन ओळखले.
व्यक्तिगत स्नेह जपत समोरच्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा त्यांचा गुण मला सुमारे चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली अचानक अनुभवलयाला मिळाला. झाले असे की त्यावर्षी माझी मुलगी दिव्येशा ही 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या दिवशी दिव्येशाला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या आधी 2015 मध्ये झालेल्या 10वी च्या परीक्षेतही दिव्येशाला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुणच मिळाले होते. ही बाब लक्षात घेत ती ज्या महाविद्यालयातून परीक्षा उत्तीर्ण झाली होती त्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तिला कॉलेजमध्ये बोलावून तिचा सत्कार केला आणि या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातमी ही प्रसारित केली. त्या बातमीत सहाजिकच तिचा पालक या नात्याने माझाही उल्लेख झाला होता. या बातम्या मी सहाजिकच समाजमाध्यमांवर व्हायलर केल्या होत्या.
ही घटना मी 2017 च्या शेवटच्या आठवड्यातली. त्यानंतर जून च्या पहिल्या आठवड्यात एका समारंभात मोहन भागवतांची माझी भेट झाली. त्या समारंभात ते व्यासपीठावर होते आणि प्रेशकांमध्ये मी दुसर्या रांगेत बसलो होतो. तेथूनही त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी ओळखीचे स्मितहास्य दिले. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटलो. मी समोर दिसताच त्यांनी नेहमीच्या शैलीत ङ्गकाय रे आजकाल तू भेटत नाहीस किती दिवस झाले तुझी भेटच नाहीफ असा प्रश्न केला. सहाजिकच मी देखील मलाही तुम्हाला भेटायचे आहे कधी वेळ देता ते सांगा. असा मुद्दा मांडला. हे बोलणे चालू असतानाच तेथे नागपूरचे महानगरसंघचालक राजेश लोया आणि संघाचे दुसरे एक अधिकारी गुड्डूजी बोकारे येऊन पोहोचले. माझ्याशी बोलत असताना पाहून त्यांनी डॉ. भागवतांना विचारले की तुम्ही अविनाशजींचे अभिनंदन केले काय? त्यावेळी आपल्या मिश्किल शैलीत ङ्गयाने कोणता पराक्रम केलाफ असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी अविनाशजींच्या मुलीला 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहे ही बातमी सर्वदूर पसरली आहे असे गुड्डूंजींनी सांगताच ङ्गआता तुला भेटायचे नाही तर तुझ्या मुलीला भेटायचे आहेफ असे सांगत लगेचच आपल्या स्वीय सहायकाला सूचना दिल्या. त्याच दिवशी मोहनजी पुढील प्रवासाला जाणार होते. ते सांगत 18 जूनला मी नागपुरात परत येतो आहे आणि त्यानंतर मी नागपुरातच आहे. त्यावेळी मला आठवण देऊन अविनाशला वेळ द्यायचा आणि त्याच्या मुलीला बोलावून घ्यायचे. मला तिचे कौतुक करायचे आहे असे त्यांनी सूचीत केले.
कामाच्या व्यापात मी मोहनजींचे हे बोलणे विसरुनही गेलो होतो. मात्र 19 किंवा 20 जूनला मला अचानक मोबाईलवर महाल संघकार्यालयातून फोन आला. यावेळी 21 जूनला संध्याकाळी साडेपाच वाजता मोहनजींनी तुम्ही वहिनी (माझी पत्नी) आणि तुमच्या मुलीला एकत्रित भेटायला बोलावले आहे असा निरोप संघ कार्यालयातून त्या संबंधिताने दिला. मोहनजींनी आठवण ठेवून बोलावले हे लक्षात येताच मी देखील सुखावलो.
मग आमची तयारी सुरु झाली. 21 जूनच्या संध्याकाळी सव्वा पाच वाजता मी माजी पत्नी सौ. अनुरुपा आणि दिव्येशा असे तिघेही महाल संघकार्यालयात पोहोचलो. त्या दिवशीच्या भेटींमध्ये आमच्या नावाची नोंद होतीच. लगेचच आम्हाला त्यांच्या विशेष दालनात नेण्यात आले. अवघ्या दहाच मिनिटात त्यांनी आम्हाला भेटीला बोलावले. आम्ही सोबत पेढे घेऊन गेलोच होतो. दिव्येशाने त्यांना पेढे देऊन नमस्कार केला आणि त्यांना बाजूला बसवून घेत तिची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी तिला सुरेख अशी सरस्वतीची मूर्ती भेट म्हणून दिली. आता घराघरात संस्कृत पोहोचवण्यासाठी तू प्रयत्न कर. असाही हितोपदेश त्यांनी केला. पुढे काय शिकणार हे विचारल्यावर जेव्हा तिने बायोटेकनोलॉजी हा विषय घेऊन बी-टेक करणार असल्याचे सांगितले तेव्हा या विषयातही पुढील संशोधन करायला तुला संस्कृतचा उपयोग होईल अशी माहितीही त्यानी दिली. सर्व उपस्थितांना पेढे द्यायला सांगून त्यांनी दिव्येशाला आशीर्वाद देत आम्हाला निरोप दिला. नागपूरच्या महाल संघकार्यालयात सरसंघचालकांच्या दालनात कोणालाही फोटो घेण्याची परवानगी नाही त्यामुळे या भेटीचे कोणतेही फोटो आमच्याजवळ उपलब्ध नाहीत. मात्र तरीही ही भेट आम्हा सर्वांच्याच कायम स्मरणात राहणारी ठरली आहे.
त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये मला नागपूरकर भोसले परिवारातर्फे दिला जाणारा राजरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. हा समारंभ मोहनजींच्या हस्ते पार पडला होता. कार्यक्रमानंतर आम्ही तिघेही मोहनजींना भेटलो त्यावेळी दिव्येशा दिसताच त्यांनी बारावीत संस्कृतची टॉपर तुच ना असा प्रश्न तत्काळ विचारला. अशा नोंदी डोक्यात ठेवण्याचे त्यांचे कौशल्य बघून आम्ही सगळेच सुखावलो.
आज संघाचे सरसंघचालक ही किती मोठी जबाबदारी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र अशाही परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांच्या परिवाराबाबत इतकी माहिती लक्षात ठेवण्याचा डॉ. मोहन भागवतांचा हा गुण निश्चितच सस्मरणीय असा म्हणावा लागेल.

अविनाश पाठक

Leave a Reply