लोकसभेत, राज्यसभेत संवाद संपलेला आहे – अरुण गुजराथी यांचे मत

नागपूर : १२ मार्च – यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले, परंतु विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल स्नेहभाव ठेवला होता. त्यांनी ईडी, आयटीची भीती दाखवून इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले नव्हते, अशी टीका माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी भाजपचे नाव न घेता केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र व नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते. गुजराथी म्हणाले, यशवंतराव यांची भाषणकला संवादाची होती. प्रचंड आत्मविश्वास त्यांच्याठायी होता. ते मृदूभाषी पण स्पष्टवक्ते होते.
त्यांचे नेतृत्व कौशल्य म्हणजे ते कटू निर्णय स्वपक्षाच्या नेत्यांना सहज स्वीकारण्यास लावत होते. संवादामुळे लोकशाही बळकट होते, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन काम करीत होते. मात्र, आजची स्थिती त्याविपरीत आहे.
लोकसभेत, राज्यसभेत संवाद संपलेला आहे. जेथे संवाद संपतो तेथे लोकशाहीत अडथळा निर्माण होतो. आज संवाद संपलेला आहे आणि वाद वाढला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी, साहित्य मंडळ अशा गोष्टींची आणि राजकारणातील सभ्यतेची जपणूक केली. परंतु आज आपण किती करंटे ठरलो आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे गांधी म्हणाले. यावेळी विशेष अतिथी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, कवी लोकनाथ यशवंत, प्रा. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. संचालन कोमल ठाकरे यांनी केले.

Leave a Reply